मंत्री होऊन भगवानबाबांच्या दर्शनाला या, महंत नामदेवशास्त्रींचे धनंजय मुंडेंना निमंत्रण!

धनंजय आपण मंत्री होऊन भगवान गडावर ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घ्यायला या, असं निमंत्रण भगवानगडाचे मठाधिपती महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री (Namdev maharaj meet Dhananjay Munde) यांनी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते धनंडय मुंडे यांना दिले.

मंत्री होऊन भगवानबाबांच्या दर्शनाला या, महंत नामदेवशास्त्रींचे धनंजय मुंडेंना निमंत्रण!

बीड : “धनंजय आपण मंत्री होऊन भगवान गडावर ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घ्यायला या,” असं निमंत्रण भगवानगडाचे मठाधिपती महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री (Namdev maharaj meet Dhananjay Munde) यांनी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते धनंडय मुंडे यांना दिले. नामदेव महाराज शास्त्री यांनी स्वत: धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांनी हे निमंत्रण दिले, धनंजय मुंडेंनी (Namdev maharaj meet Dhananjay Munde) ट्वीट करुन माहिती दिली.

मराठवाड्याचे शक्तीपीठ समजल्या जाणाऱ्या भगवान गडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक पर्वातील थोर संत भगवानबाबांच्या वास्तव्याने पावन झालेला भगवानगड दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचा ऊर्जास्रोत म्हणून प्रसिद्ध आहे. याचठिकाणी काही वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांना राजकीय हेव्यादेव्यांमुळे येण्यास मज्जाव करण्यात आला होता. परंतु आज (13 डिसेंबर) स्वतः महंत नामदेव शास्त्री यांनीच मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निमंत्रण दिले. मुंडे यांनी ‘संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ असे म्हणत महंत नामदेव शास्त्रीन्नी आपल्याला गडावर दर्शनाला येण्याची ‘आज्ञा’ केल्याचे म्हटले आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गडावर स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात महंत नामदेव शास्त्री यांनी राजकीय भाषणास बंदी घातली होती. यावरुन भगवान गडावर राजकीय वाद निर्माण झाला होता. धनंजय मुंडे हे धार्मिक सुसंस्कृतपणा जपण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आज नामदेव शास्त्री यांनी स्वतः मुंडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन परळीतील विजयासाठी त्यांचा गौरव करत आशीर्वाद दिले. तसेच मुंडेंना भगवानगडावर येऊन संत भगावनबाबांचे आशीर्वाद घेण्याचे निमंत्रण दिले. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यात चर्चेला उधाण आले आहे.

यानंतर नामदेव शास्त्री यांनी नाशिकला परतताना माध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी ते म्हणाले,  “मुंबईला माझ्या गुरुजींचा कार्यक्रम होता. त्यावेळेस सहज मुंबईत योग आल्याने भेट झाली. भगवानगडावर कधीही राजकीय भाषण होणार नाही, हा माझा शब्द आहे. भगवानगडावर दर्शनाला येण्यास कोणालाही बंदी नाही. ते मंदिर असून भगवान बाबांची समाधी आहे. त्या ठिकाणी सर्वजण दर्शन घेऊ शकतात. ते कोणाच्याही मालकीचं नाही. ते कोणत्याही महंताचे नाही. जे श्रद्धावान आहेत, त्यांनी तिथं महाप्रसाद घेतला पाहिजे” असेही नामदेव शास्त्री यावेळी म्हणाले.

Published On - 11:15 pm, Fri, 13 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI