गणपतराव देशमुखांच्या घरी शरद पवार पण या खास फोटोची चर्चा का होतेय? वाचा सविस्तर

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (आबा) यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. (Ganpatrao Deshmukh)

गणपतराव देशमुखांच्या घरी शरद पवार पण या खास फोटोची चर्चा का होतेय? वाचा सविस्तर
sharad pawar

सोलापूर: शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (आबा) यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन केलं. पवारांच्या या भेटीचे फोटोही व्हायरल झाले आहेत. मात्र, या भेटीपेक्षा फोटोतील देशमुखांच्या घरातील शहाबादी फरशीचीच अधिक चर्चा होताना दिसत आहे. अकरावेळा निवडून येऊनही आबांची राहणी किती साधी होती आणि त्यांनी संपूर्ण हयात भर मुल्यांवर आधारीत राजकारण केल्याचंही यातून दिसून येत आहे. त्यामुळे आबांच्या घरातील शहाबादी फरशी, लाकडी फर्निचर आणि त्यांच्या जुन्या गाडीचीच अधिक चर्चा होत आहे. (NCP chief sharad pawar meets kin of PWP veteran late Ganpatrao Deshmukh)

दोन दिवसांपूर्वी शरद पवार हे गणपतराव देशमुखांच्या घरी सांगोल्याला गेले होते. यावेळी त्यांनी आबांच्या पत्नी आणि मुलाचं सांत्वन केलं. पवार बराचवेळ आबांच्या घरी होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आबांचं कर्तृत्व, साधं राहणं, विद्वता याचं कौतुक करतानाच जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. पवारांचे हे फोटो व्हायरलही झाले. पण चर्चा रंगली ती आबांच्या घरातील शहाबादी फरशीची आणि साध्या राहणीची.

शहाबादी फरशीची चर्चाच का?

आबांच्या घरातील शहाबादी फरशीवर सोशल मीडियातून चर्चा होत आहे. त्याला कारणही तसं आहे. आबा गेली 50 वर्षे विधानसभेत होते. सलग अकरावेळा ते निवडून आले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीसांपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केलं. ते पेशाने वकीलही होते. मात्र, तरीही त्यांनी आयुष्यात संपत्ती संचय केला नाही. त्यामुळेच एवढ्या वेळा निवडून येऊनही त्यांचं घर तसंच होतं. घरातील सामानही तेच होतं. घरातील फरशीही अत्यंत साधी होती. शहाबादी. साधा 30-40 हजार रुपये कमावणारा व्यक्तिही घरात मार्बलच्या लाद्या बसवतो. पण अकरावेळा निवडून आलेल्या आबांच्या घरात अत्यंत साधी शहाबादी फरशी होती. पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्याचेही वर्ष दोन वर्षात टोलेजंग घर होतात. त्या मानाने आबा किती साधे होते हेच त्यातून दिसून येत असल्याने या शहाबादी फरशीची अधिक चर्चा होत आहे.

लाकडी फर्निचर, घर हेच कार्यालय

आबांच्या घरातील फरशीच नव्हे, तर घराचा हॉल हेच आबांचं कार्यालय होतं. त्यांनी आमदार झालो म्हणून नवं कार्यालय घेतलं नाही. घरातच बसून ते कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवायचे. आबांच्या घरात लाकडी टेबल (साधी शाल अंथरलेला) आहे. लाकडी खुर्च्या आहेत. लाकडी टी-पॉय आहे. मेन रोड लगतच आबांचं घर असल्याने, रस्त्यावरूनच आबा काम करताना दिसायचे. आजही आबांची 9100 गाडी रस्त्यांवर दिसते. यावरून आबा व्यक्तिगत आयुष्यात किती साधे होते हे अधिकच अधोरेखित होते.

नेटकरी काय म्हणतात

आबांच्या या साध्या राहणीवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आबांच्या इमानदारीचा पाया किती भक्कम होता हे यावरून लक्षात येते, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, सलग अकरा वेळेस निवडून येण्याचं हेच कारण असावं..!, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. (NCP chief sharad pawar meets kin of PWP veteran late Ganpatrao Deshmukh)

संबंधित बातम्या:

राजकारणातील अजातशत्रू हरपला, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन

शरद पवार सांगोला दौऱ्यावर, गणपतराव देशमुखांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट

केंद्राने खाऊचा डबा दिला, पण डबा रिकामाच आहे; घटना दुरुस्ती विधेयकावरून राऊतांची खोचक टीका

(NCP chief sharad pawar meets kin of PWP veteran late Ganpatrao Deshmukh)

Published On - 11:05 am, Tue, 10 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI