काल राष्ट्रवादीकडून आमदारकी मिळाली अन् आज थेट विरोधी पक्षनेत्यासोबत प्रवास; सतीश चव्हाण-फडणवीस भेटीने चर्चांना उधाण

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. | MLC Election results 2020

  • दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद
  • Published On - 23:48 PM, 5 Dec 2020
NCP MLA Satish Chavan and Devendra Fadnavis travelling together by plane

औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी एकच विमानात सोबत प्रवास केल्याचा फोटो समोर आला आहे. आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस हे औरंगाबाद विमानतळावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तेव्हा आमदार सतीश चव्हाणही त्याच विमानात होते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि सतीश चव्हाण यांनी एकाच सीटवरून हा प्रवास केला. फडणवीस-चव्हाण यांच्या एकत्रित विमान प्रवासामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (NCP Satish Chavan meet BJP Devendra Fadnavis in Aurgabad)

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये विधानपरिषदेच्या चार जागांवर महाविकासआघाडीने घवघवीत यश मिळवले. अगदी भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे आणि नागपूर मतदारसंघांनाही महाविकासआघाडीने खिंडार पाडले.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांची विजयाची हॅटट्रिक

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. सतीश चव्हाण यांना तब्बल 116638 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना 58743 मतांवर समाधान मानावं लागलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण जवळपास 57895 मताधिक्क्यानं विजयी झाले आहेत.

विधान परिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधान परिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येण्याची शक्यताही राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

येत्या काळात एकट्याला सत्ता स्थापण्याची संधी; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

येत्या काळात महाराष्ट्रामध्ये एकट्याला सत्तेवर बसविण्याची संधी तिन्ही पक्षांनी दिली असून, त्याचा फायदा घेणार असल्याचं मोठं विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आम्ही स्वतःच्या ताकदीवर दोन जागा मिळविल्या आहेत, तसेच हैदराबाद इथं झालेल्या निवडणुकीत ही प्रचंड मोठं यश मिळालं आहे, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या:

आता महाविकास आघाडीचे सरकार सांगून पाडणार नाही, थेट कृती करणार: दरेकर

येत्या काळात एकट्याला सत्ता स्थापण्याची संधी; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

भाजपची कबर खोदायला सुरुवात, भाजपचेच अहंकारी नेते पक्षाला बुडवणार, अमोल मिटकरींचा टोला

(NCP Satish Chavan meet BJP Devendra Fadnavis in Aurgabad)