‘भाजपचं माझ्यावर प्रेम, पण मी पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता’, शशिकांत शिंदेंचं मिश्किल वक्तव्य, 100 कोटीच्या ऑफरचाही पुनरुच्चार

| Updated on: Oct 20, 2021 | 7:12 PM

आमदार शशिकांत शिंदे आपल्या वक्तव्यांनी अनेकदा चर्चेत येतात. शिंदे यांनी बुधवारी साताऱ्यात बोलताना एक मिश्किल वक्तव्य केलंय. भाजपचं आजही माझ्यावर प्रेम आहे. त्यावेळी त्यांनी मला 100 कोटीची ऑफर दिली होती. पण मी पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, असं शिंदे म्हणाले.

भाजपचं माझ्यावर प्रेम, पण मी पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता, शशिकांत शिंदेंचं मिश्किल वक्तव्य, 100 कोटीच्या ऑफरचाही पुनरुच्चार
शशिकांत शिंदे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आपल्या वक्तव्यांनी अनेकदा चर्चेत येतात. शिंदे यांनी बुधवारी साताऱ्यात बोलताना एक मिश्किल वक्तव्य केलंय. भाजपचं आजही माझ्यावर प्रेम आहे. त्यावेळी त्यांनी मला 100 कोटीची ऑफर दिली होती. पण मी पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, असं शिंदे म्हणाले. शिंदेंच्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. (Shashikant Shinde again claims that BJP has offered Rs 100 crore for joining the party)

साताऱ्यात बोलताना शशिकांत पाटील यांनी 100 कोटीच्या ऑफरचा पुनरुच्चार केला. ‘भाजपचं आजही माझ्यावर प्रेम आहे. त्यावेळी त्यांनी 100 कोटीची ऑफर दिली होती. त्यावेळी ते 100 कोटी घेतले असते तर बरं झालं असतं. पण भाजपलाही माहिती आहे की मी शरद पवार यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, असं वक्तव्य शिंदे यांनी केलं आहे.

जानेवारीत शिंदेनी केला होता खळबळजनक दावा

शिंदे यांनी जानेवारीतही 100 कोटीच्या ऑफरबाबत सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना भाजपकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माझाही समावेश होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ. तसेच तुम्हाला निवडून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपकडून 100 कोटी रुपये खर्च केले जातील, असेही मला सांगण्यात आले होते, असा दावा शशिकांत शिंदे यांनी जानेवारीत केला होता. मात्र, त्यावेळेस मी ऑफर नाकारली व भविष्यातही नाकारतच राहीन, असेही शिंदे त्यावेळी म्हणाले होते.

किरीट सोमय्यांवर खोचक टीका

‘आम्ही ईडीला पळवून लावणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. मागे इकडे किरीट सोमय्या आले होते. मी दादांना म्हटलं होतं, मला परवानगी द्या, त्यांना मी बघून घेतो, पण दादांनी सांगितलं सबुरीने घ्या. म्हणून शांत बसावं लागलं, असं शशिकांत शिंदे म्हणाले. आपण परिणामांची चिंता करत नाही, असं सांगताना ईडी, आणि इनकम टॅक्सच्या आपण बापाला घाबरत नाही. कारण सध्याच्या राजकारणात ईडीला पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, असं शिंदे म्हणाले.

प्रवीण दरेकरांचं शिंदेंना प्रत्युत्तर

दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिंदेंच्या 100 कोटीच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिलीय. शशिकांत शिंदे यांना भाजपनं 100 कोटीची ऑफर दिली असेल असं मला वाटत नाही. ते पब्लिसिटीसाठी असे स्टंट करत असतात, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केलीय.

इतर बातम्या : 

अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळाला! सरकारकडून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

‘हेच कपिल पाटील फडणवीस, मोदींविरोधात बोलणारे म्हणून प्रसिद्ध होते’, विनायक राऊतांचा पलटवार

Shashikant Shinde again claims that BJP has offered Rs 100 crore for joining the party