मराठा मतांसाठी राष्ट्रवादीची ‘व्यूहरचना’

मराठा मतांसाठी राष्ट्रवादीची 'व्यूहरचना'

अहमदनगर : मराठा मतांसाठी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीने नवी खेळी आखल्याची चर्चा आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून सर्जेराव निमसे यांच्या नावाची चर्चा आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या समितीचे निमसे तज्ञ सदस्य होते. मराठा आरक्षणातील लढाईतील शिलेदाराला लोकसभेची उमेदवारी देऊन राष्ट्रवादी आरक्षणात आमचाही सहभाग असल्याची व्यूहरचना करण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अत्यंत महत्वाचा ठरला. याच आयोगाच्या सदस्यांमध्ये सर्जेराव निमसे हे तज्ञ सदस्य होते. त्याचबरोबर ते स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आणि लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरु आहेत.

राष्ट्रवादीत प्रामुख्याने मराठा समाजाचं प्राबल्य असल्याची बोललं जातं. त्यातच आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नियुक्त केलेल्या समितीतील तज्ञ सदस्य सर्जेराव निमसे यांचं नाव लोकसभेसाठी पुढं केलंय. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढलेल्या शिलेदाराला लोकसभेची उमेदवारी दिल्याचा प्रचार करु शकते. या माध्यमातून राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणात आमचाही सहभाग असल्याचा प्रचार करण्याची संधी राष्ट्रवादीला मिळेल. मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं भाजपचं श्रेय हिसकावण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचं बोललं जातंय.

मराठा समाजाला राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनंतर 16 टक्के आरक्षण देण्यात आलं. आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा एकमेव आधार होता. या आयोगामध्ये तज्ञ सदस्य म्हणून सर्जेराव निमसे यांचाही समावेश होता. निमसे यांची बाजू अद्याप कळू शकलेली नाही.

आणखी तीन नावंही चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या वाट्याच्या लोकसभा मतदारसंघाच्या जागा निश्चित करण्यासाठी बैठकांचं सत्र सुरु केलं आहे. काल पहिली बैठक पार पडल्यानंतर आजही बैठक सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय निश्चित केला आहे. त्यामुळे 48 जागांपैकी 40 जागांचा प्रश्न सुटला आहे. उर्वरित 8 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीत घमासान सुरु आहे. यामध्ये अहमदनगरच्या जागेचा तिढा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांनी नगरच्या जागेवर दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आजच्या बैठकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी तीन नावंही निश्चित केली आहेत. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. यामध्ये –

  1. दादाभाऊ कळमकर, माजी आमदार
  2. नरेंद्र घुले पाटील
  3. प्रतापराव ढाकणे ही 3 नाव शॉर्ट लिस्ट करण्यात आली आहेत.

काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये सहा जागांचा पेच आहे. त्यामध्ये अहमदनगर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नंदूरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या जागांचा समावेश आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI