मुख्यमंत्री सेनेचाच, भाजप कार्यालयासमोर शिवसेनेची पोस्टरबाजी

मुख्यमंत्री सेनेचाच, भाजप कार्यालयासमोर शिवसेनेची पोस्टरबाजी

नाशिकमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर मुख्यमंत्री सेनेचाच होणार असे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमुळे शिवसेना-भाजपमध्ये चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Namrata Patil

|

Jul 16, 2019 | 9:41 AM

नाशिक : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. मात्र, तरीही मुख्यमंत्री कुणाचा असणार यावरुन भाजप-शिवसेनेत जोरदार वाद सुरु आहे. या वादाचे रुपांतर आता पोस्टर वॉरमध्ये झाले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर मुख्यमंत्री सेनेचाच होणार असे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमुळे शिवसेना-भाजपमध्ये चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री कोणाचा यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु आहेत. त्यातच मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यात आता नाशिकच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी उडी घेतली आहे.

नाशिकमध्ये ठिकठिकाणच्या भाजप कार्यालयासमोर शिवसेनेने पोस्टर बाजी केली आहे. या पोस्टरमध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांचे फोटो लावले असून त्यावर ‘मुख्यमंत्री शिवसेना-भाजपा युतीचाच होणार, याचा अर्थ शिवसेनेचाच होणार‘ असे लिहिले आहे. या पोस्टरखाली नाशिकच्या नगरसेविका किरण गामणे (दराडे) यांचाही फोटो पाहायला मिळत आहे.

दरम्यान काल (15 जुलै) भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी या वादात उडी घेत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “मी हे खूप स्पष्टपणे सांगत आहे की सध्या महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि पुन्हा देखील भाजपचाच मुख्यमंत्री होईल. आम्ही महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक लढवत आहोत. ही निवडणूक आम्ही युतीतच लढू, मात्र मुख्यमंत्री भाजपचाच बनेल हे निश्चित आहे, असे वक्तव्य सरोज पांडे भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे  यांनी केले होते. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता तयार झाल्याची चर्चा होती. सरोज पांडे यांच्या या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये हे पोस्टर लावण्यात आले असावेत अशी चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्रीपदावरुन काहीही धुसफूस नसल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाध्यक्ष अमित शाह आणि माझं बोलणं झालंय. त्यामुळे कुणीही मध्ये नाक खुपसण्याची गरज नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला होता.

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होईल : सरोज पांडे

मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाहांशी बोललोय, इतरांनी नाक खुपसू नये : उद्धव ठाकरे


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें