मॅच हातातून गेली, असं वाटत असतानाच बाजी पलटते : गडकरी

कधीतरी तुम्हाला वाटतं सामना तुमच्या हातून निसटत चालला आहे. पण अंतिम निकाल अगदी उलट लागतो, असं नितीन गडकरी म्हणाले.

मॅच हातातून गेली, असं वाटत असतानाच बाजी पलटते : गडकरी

नवी दिल्ली : क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, हातातली मॅच जात आहे, असं वाटत असतानाच बाजी पलटते, असं सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. मात्र महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर थेट बोलणं गडकरींनी (Nitin Gadkari on Maharashtra Politics) टाळलं.

महाराष्ट्रात कोण सत्ता स्थापन करणार? आणि जर बिगरभाजप सरकार सत्तेत आलं, तर सध्या मुंबईत सुरु असलेल्या प्रकल्पांचं, पायाभूत सुविधांचं काय होणार? असा प्रश्न नितीन गडकरींना विचारण्यात आला. ‘योग्य प्रश्न विचारलात, पण चुकीच्या माणसाला. सत्तास्थापनेविषयी योजना आखणारे नेते तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतात. इतिहासात डोकावलं, तर सत्तापालट झाल्यानंतरही प्रकल्प सुरुच राहतात, कोणतीही बाधा येत नाही.’ असं गडकरी म्हणाले.

‘आता कोणाचं सरकार येणार, मला माहिती नाही’ असं गडकरी पॉझ घेऊन म्हणाले. कोणतंही सरकार आलं, भाजपचं, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना, ते विकासासाठी होणाऱ्या सकारात्मक आणि धोरणात्मक उपक्रमांना पाठिंबा देतील’ अशी खात्री गडकरींनी व्यक्त केली.

‘क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं. कधीतरी तुम्हाला वाटतं सामना तुमच्या हातून निसटत चालला आहे. पण अंतिम निकाल अगदी उलट लागतो. मी दिल्लीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाशी माझा फारसा संबंध येत नाही’ असं म्हणत गडकरींनी थेट भाष्य (Nitin Gadkari on Maharashtra Politics) टाळलं. मुख्यमंत्रिपद भूषवण्यात रस नसल्याचं गडकरींनी आधीच स्पष्ट केलं होतं.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI