‘भाबीजी…’ला निवडणूक आयोगाची नोटीस

'भाबीजी...'ला निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय हिंदी मालिका ‘भाबीजी घर पर है’ आणि ‘तुझसे है राबता’ या मालिकेला निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. 24 तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने या नोटीसद्वारे दिले आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी काल (8 मार्च) हिंदी मालिकांवर मोदींचा प्रचार आणि भाजपचा प्रचार सुरु असल्याचा आरोप करत, निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यावरच आज निवडणूक आयोगाने कारवाई करत या हिंदी मालिका आणि वाहिन्यांना नोटीस पाठवली आहे.

गेले काही दिवस हिंदी वाहिन्यांवरील मालिकेतून नरेंद्र मोदींच्या योजना आणि त्यांच्या पक्षाच्या जाहिराती अप्रत्यक्षपणे दाखवण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचा आहे. त्यामुळे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी याला विरोध करत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या मालिकांवर बंदी घालावी तसेच निर्मात्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. ‘भाबीजी घर पर है’ आणि ‘तुझसे है राबता’ या दोन मालिकेतून मोदींचा प्रचार केला जात होता, असा काँग्रेसचा आरोप आहे.

‘भाबीजी घर पर है’ या मालिकेतून LPG गॅस कनेक्शन योजना आणि स्वच्छ भारत यावर भाष्य करण्यात आलं आहे. यामुळे या कार्यक्रमांवर काँग्रेसतर्फे आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या या आरोपानंतर निवडणूक आयोगाने या दोन्ही मालिकांना नोटीस पाठवली आहे. 24 तासांच्या आता खुलासा करा असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. यामुळे ही मालिका आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

संबधित बातम्या : ‘भाबीजी घर पर है’मधून भाजपचा प्रचार, मालिकेवर…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI