उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या 67 पैकी 63 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:55 PM, 25 May 2019
उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या 67 पैकी 63 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोदी ‘त्सुनामी’ने विरोधकांचा सुपडासाफ केलाय. राजकारणाचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशात देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. उत्तर प्रदेशात 80 पैकी काँग्रेसला फक्त एक जागा जिंकता आली, तर फक्त चार उमेदवारांना डिपॉझिट वाचवता आलंय. काँग्रेसने 67 जागांवर निवडणूक लढवली होती. यापैकी 63 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय.

प्रियांका गांधी यांची काँग्रेसच्या महासचिवपदी निवड करण्यात आली आणि त्यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली. प्रियांका गांधींमध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी दिसत असल्याचं सांगत काँग्रेसला मोठा फायदा होणार असल्याचाही दावा करण्यात आला. पण प्रियांका गांधींनी प्रचार केलेल्या 97 टक्के जागांवर काँग्रेसचा पराभव झालाय. काँग्रेसची एवढी वाईट परिस्थिती आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत 1977 ला झाली होती. त्यावेळी काँग्रेसला उत्तर प्रदेशात खातंही उघडता आलं नव्हतं.

चार जणांचं डिपॉझिट वाचलं

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या चार जणांना डिपॉझिट वाचवण्याएवढी मते मिळाली. यामध्ये यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, इम्रान मसूद आणि श्रीप्रकाश जयस्वाल यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात सोनिया गांधींच्या रुपाने काँग्रेसने फक्त एकच जागा जिंकली आहे. रायबरेलीतून सोनिया गांधींनी 534918 मते घेतली, जी एकूण मतांच्या 55.80 टक्के आहेत. तर राहुल गांधींना अमेठीत 413394 (43.86%) मते मिळाली. कानपूरमध्ये श्रीप्रकाश जयस्वाल यांनी 313003 (37.13%), सहारनपूरमधून इम्रान मसूद यांनी 207068 (16.81%) मते मिळवली.

दिग्गजांचं डिपॉझिट जप्त, एकाला नोटापेक्षाही कमी मते

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद, माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह, जितीन प्रसाद यांच्यासह निर्मल खत्री, नसीमुद्दीन सिद्दीकी आणि अजय राय यांच्यासारख्या दिग्गजांना डिपॉझिट वाचवता आलं नाही. विशेष म्हणजे 10 जागांवर काँग्रेस उमेदवारांना एकूण मतांच्या दोन टक्क्यांपेक्षाही कमी मते मिळाली. तर भदोहीमधून काँग्रेसचे उमेदवार अखिलेश यांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली.

डिपॉझिट जप्त म्हणजे काय?

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, एखाद्या उमेदवाराला पडलेल्या एकूण मतांपैकी 16.66 टक्के न मिळाल्यास डिपॉझिट जप्त केलं जातं. या परिस्थितीमध्ये उमेदवाराने फॉर्म भरताना जमा केलेली 25 हजार रुपये रक्कम जप्त केली जाते. 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात काँग्रेसने 67 उमेदवार दिले होते. उर्वरित 13 जागांवर दुसऱ्या पक्षांना समर्थन दिलं होतं. तर काही ठिकाणी उमेदवारी रद्द झाली होती.