अध्यक्ष महोदय, ‘मी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हा अंगावर जायचो, पण……’

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत आज भाजपने नवा मुद्दा उपस्थित करत, नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याची मागणी केली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:47 PM, 18 Dec 2019
अध्यक्ष महोदय, 'मी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हा अंगावर जायचो, पण......'

नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत आज भाजपने नवा मुद्दा उपस्थित करत, नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याची मागणी केली. पहिल्या दिवशी सावकर, दुसऱ्या दिवशी शेतकरी नुकसान भरपाईनंतर, भाजपने तिसऱ्या दिवशी नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन सभागृहाचं कामकाज बंद पाडलं. नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेने मंजूर केला आहे, सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली नाही, मग हा कायदा संविधानविरोधी कसा, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. याशिवाय सुधीर मुनगंटीवार यांनीही या केंद्राचा कायदा राज्यात लागू करण्याची मागणी केली. (Devendra Fadnavis advice to Nana Patole )

त्यावर सत्ताधारी पक्षाकडून अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर देताना, देशभरात या कायद्याला विरोध होत आहे, त्यामुळे कायदा लागू करणं योग्य नाही असं म्हटलं. या सर्व राडेबाजीदरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावाचं निवेदन वाचत होते. चर्चेचा आजचा शेवटचा दिवस असल्याचं त्यांनी नमूद केलं.

त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार दोघेही बोलण्यासाठी उभे होते. यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तुम्ही दोघांपैकी कोण बोलेल ते सांगा? असा प्रश्न विचारला.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार 33 हजार मतांनी निवडून आले आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही का, असा प्रश्न उपस्थित केला. पॉईंट ऑफ ऑर्डर कोणीही सदस्य घेऊ शकतो, त्यावर बंदी घालता येत नाही, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीसांचा विधानसभा अध्यक्षांना सल्ला

यावेळी फडणवीसांनी अध्यक्षांना सल्ला दिला. फडणवीस म्हणाले, “अध्यक्ष महोदय आपण ज्येष्ठ आहात, अध्यक्षांनी थोडा जास्त संयम ठेवावा. आपण संयमी आहात, पण अध्यक्षांनी जास्त संयम दाखवायचा असतो. मी पण जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हा माझाही स्वभाव असाच होता, मी अंगावर जायचो. मग मी स्वत:ला समजावलं, आपण मुख्यमंत्री आहे, हे आपलं काम नाही. आपण संयमाने वागलं पाहिजे, मग मी संयमाने वागायला लागलो. तसं आपणही आक्रमक आहात. पण आपण अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर एवढी आक्रमकता योग्य नसते. संयमाने आपण वागावं अशी हात जोडून विनंती आहे, असं देवेंद्र फडणवीस नाना पटोले यांना म्हणाले.