…म्हणून पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा : प्रकाश शेंडगे

पंकजा मुंडे यांनी हीच ती वेळ साधून, भाजपला सोडचिठ्ठी द्यावी आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा, असा सल्ला मी देईन, असंही आमदार शेंडगे म्हणाले.

  • हेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 14:51 PM, 4 Dec 2019
...म्हणून पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा :  प्रकाश शेंडगे

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे या ओबीसी असल्यामुळेच त्यांचं पक्षात खच्चीकरण केलं जात आहे, असा घणाघाती आरोप धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे (Pankaja Munde should join Shiv Sena:  Prakash Shendge) यांनी केला. इतकंच नाही तर पंकजा मुंडे यांनी हीच ती वेळ साधून, भाजपला सोडचिठ्ठी द्यावी आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा, असा सल्ला मी देईन, असंही प्रकाश शेंडगे म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Pankaja Munde should join Shiv Sena: Prakash Shendge)

पंकजा मुंडे या ओबीसी आहेत. त्यामुळेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे त्यांचंही खच्चीकरण होत आहे. पंकजा मुंडेंनी आता भाजपला सोडचिट्ठी द्यावी आणि शिवसेनेत जावं, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

गोपीनाथ मुंडे यांनाही भाजपमधून काढण्याचा प्रस्ताव विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत आणला गेला होता, असा दावा प्रकाश शेंडगे यांनी केला.

धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्याय देतील, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवतील असा आम्हाला विश्वास वाटतो, असं शेंडगे यांनी नमूद केलं.

धनगर आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागे घ्यावे आणि त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केली आहे.

आरे आणि नाणार येथील आंदोलकांवरील गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले आहेत. याच पार्श्वभूमीवर धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. ते गुन्हेही मागे घ्यावेत अशी मागणी शेंडगे यांनी केली आहे.