किती दिवस तुम्ही चमचेगिरी करणार, पंकजांचा धनंजय मुंडेंना थेट सवाल

किती दिवस तुम्ही चमचेगिरी करणार, पंकजांचा धनंजय मुंडेंना थेट सवाल

अहमदनगर : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचा चांगलाच समाचार घेतला. “आणखी किती दिवस तुम्ही चमचेगिरी करणार”, असा सवाल पंकजांनी धनंजय मुंडे यांना केला. अहमदनगर तालुक्यातील पाथर्डीत भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. शरद पवार यांच्या राजकारणाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

“पवारांना सवयी आहेत, कुणाच्या घरात कुणाचं राहूच द्यायचं नाही”, असा टोला पंकजांनी पवारांना लगावला. तसेच नगर शहरात पवारांची घुसखोरी सुरु असल्याचा आरोपही पंकजांनी केला. तर धनंजय मुंडेंच्या प्रश्नाचंही यावेळी पंकजांनी उत्तर दिलं. “आमचे भाऊ धनंजय मुंडे विचारतात, प्रितम ताईंची, सुजय विखे पाटलांची पात्रता काय निवडणूक लढवण्याची? मात्र, हे दोघेही डॉक्टर आहेत. तुमच्या नेत्यांना नीट बोलताही येत नाही, त्यांची पात्रता विचारा”, असा टोला पंकजा यांनी धनंजय मुंडेंना लगावला.

या सभेत पालकमंत्री राम शिंदेही उपस्थित होते. भाषण करत असताना राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांची नक्कल केली. यावेळी सभेत एकच हशा पिकला. राम शिंदेंनी सुजय विखे आणि पार्थ पवार यांची तुलना केली. “आपल्या उमेदवारचं भाषण आणि त्यांच्या उमेदवाराचं भाषण बघा”, असं म्हणत त्यांनी पार्थ पवार यांची नक्कल करून दाखवली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI