भाषणापूर्वी मोदी संविधानासमोर नतमस्तक, 353 खासदार उठून पाहत राहिले

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:23 PM, 25 May 2019
भाषणापूर्वी मोदी संविधानासमोर नतमस्तक, 353 खासदार उठून पाहत राहिले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एनडीएचा संसदीय नेता निवडण्यात आलं. यानंतर त्यांनी राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा केला. लवकरच मोदींचा शपथविधी होणार आहे. यापूर्वी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मोदींनी एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन केलं. पण मोदी भाषणाला उठल्यानंतर ते अगोदर संविधानासमोर नतमस्तक झाले. व्यासपीठावरुन उठून मोदी संविधानाकडे गेले. यावेळी संसदेतील सर्व खासदार आणि उपस्थित नेते उभा राहून मोदींकडे पाहत होते.

या कार्यक्रमासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे देखील उपस्थित होते. यावेळी मोदींनी खासदारांना एक सल्लाही दिला. अडवाणी नेहमी सांगायचे की दिखाऊपणापासून नेहमी दूर रहायला हवं. इथे आलेल्या सर्व खासदारांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्यावर जबाबदारी आहे. काही जण ऑफ दी रेकॉर्ड बोलण्यासाठी येतात. पण ऑफ दी रेकॉर्ड काहीही नसतं, असं म्हणत कॅमेऱ्यापासून दूर राहण्याचा सल्ला मोदींनी दिला.

“मंत्रीपदाच्या लोभाला बळी पडू नका”

नरेंद्र मोदींनी “नवनिर्वाचित खासदारांनो, मंत्रीपदाच्या लोभाला बळी पडू नका”, असंही सांगितलं. “विविध नेत्यांची मंत्रीपदी घोषणा होण्यापूर्वीच मीडियामध्ये त्यांची नावे मंत्री म्हणून झळकायला सुरुवात होईल. मात्र या सर्व अफवांपासून खासदारांनी दूर राहा, असेही नरेंद्र मोदींनी सांगितलं. सध्या देशात अनेक नरेंद्र मोदी जन्माला आले आहे. ज्यांनी मंत्रीमंडळाच्या स्थापनेपूर्वीच मंत्रीमंडळ बनवलं आहे. जे जिंकले आहेत, ते सर्व माझे आहेत. येत्या काही दिवसात माध्यमांत अनेक खोट्या गोष्टी झळकतील. विरोधी पक्ष सत्ता स्थापन करणार असल्याचंही तुमच्या कानावर येईल. मात्र याकडे दुर्लक्ष करा, माझा शपथविधी होईपर्यंत याकडे लक्ष देऊ नका, देशात एनडीएचं सरकार येणार आहे. त्यामुळे नवनिर्वाचित खासदारांनी खोट्या अफवांपासून काही काळ दूर राहा, असं माझं स्पष्ट मत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी संसदेत नवनिर्वाचित खासदारांशी बोलताना सांगितलं.

सत्तास्थापनेचा दावा

मोदींची संसदीय नेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर एनडीएच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. मोदींनीही राष्ट्रपतींची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. मोदींना पंतप्रधान नियुक्त करण्यात आलं असून शपथविधीच्या तयारीसाठी वेळ देण्यात आला आहे. लवकरच राष्ट्रपतींना शपथविधीची तारीख कळवली जाईल.

VIDEO : मोदींचे नवनिर्वाचित खासदारांना महत्त्वाचे पाच सल्ले