मोठी बातमी: रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोन

रश्मी ठाकरे या सध्या कोरोना झाल्यामुळे मुंबईच्या एच.एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. | Rashmi Thackeray PM Narendra Modi

मोठी बातमी: रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोन

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenda Modi) यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. रश्मी ठाकरे या सध्या कोरोना झाल्यामुळे मुंबईच्या एच.एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. (PM Narendra Modi call Rashmi Thackeray)

रश्मी ठाकरे यांना 23 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच त्यांनी स्वत: क्वारंटाईन करुन घेतलं होतं. त्यानंतर रश्मी ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महत्वाची बाब म्हणजे 11 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रश्मी ठाकरे यांना केलेल्या फोनमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने एनडीएला सोडचिठ्ठी देत भाजपशी फारकत घेतली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड वितुष्ट आले होते. राज्यातील भाजप नेते ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. सचिन वाझे आणि परमबीर सिंह लेटरबॉम्बवरुन हा वाद आणखी विकोपाला गेला होता. भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा केली होती. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन करणे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे.

आदित्य ठाकरेंनाही कोरोना

ज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य यांनी स्वत: 20 मार्च रोजी ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या”, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं.

शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीही मोदींचा फोन

राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना पोटदुखी आणि पित्ताशयाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. अनेकांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. यामध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली होती.

(PM Narendra Modi call Rashmi Thackeray)

Published On - 8:30 am, Thu, 1 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI