कल्याण-डोंबिवली महापौरपदावरून राजकीय तापमान वाढलं; गणेश नाईक यांच्या वक्तव्याने पुन्हा वाद
कल्याण- डोंबिवलीचा महापौर पदावरुन भाजपाचे ज्येष्ठे नेते गणेश नाईक यांनी दावा केल्याने कल्याण आणि डोंबिवलीत राजकीय घमासान झाले आहे. प्रत्येक पक्ष आपलाच महापौर असणार असा दावा करीत आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महापौर कोणाचा होणार यावरुन दावे प्रतिदावे केले जात आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी महापौर हा भाजपाचाच असेल असा दावा केल्याने कल्याण आणि डोंबिवलीत राजकारणात तापले आहे. विरोधकांनी या गणेश नाईक यांच्या दाव्याचा चांगला समाचार घेतला आहे. विषेश म्हणजे भाजपा, शिंदे गट काँग्रेस, मनसे आणि ठाकरे गट अशा प्रत्येकांनी महापौर आपलाच असेल असा दावा केला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर कोणाचा बसेल? भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी महापौर भाजपचाच असेल, असं स्पष्ट वक्तव्य केल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या वक्तव्यावर जोरदार टीका करत भाजपवर ताशेरे ओढले आहेत. काँग्रेस, मनसे, ठाकरे गट आणि शिंदे गट अशा सर्वांनीच आपला महापौर बसेल असा दावा केल्याने आता राजकीय तापमान वाढलं आहे.”
ठाणे जिल्ह्यात भाजप हा नंबर एकचा पक्ष राहील, कल्याण-डोंबिवलीत भाजपचाच महापौर बसेल, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केला आहे.त्यावरून आता कल्याण-डोंबिवलीचे राजकारण तापलं आहे. विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की भाजप केवळ घोषणा करते. पण जनतेकडे लक्ष देत नाही. महापौर आमचाच, मुख्यमंत्री आमचाच…अशा घोषणा म्हणजे व्होट चोरीचा यांचा प्लॅन आहे असाही आरोप कुलकर्णी यांनी केला आहे.
दुसरीकडे काँग्रेसेचे दुसरे नेते काँग्रेस प्रदेश सचिव सुरेंद्र आव्हाड यांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपकडे फारसं संख्याबळ नाही, उलट आगामी निवडणुकीत काँग्रेसच किंगमेकर ठरेल,असाही दावा सुरेंद्र आव्हाड यांनी केला आहे. प्रशासक बसूनही शहराची अवस्था खड्डेमय झाल्याचं सांगत भाजप-शिवसेनेवर फोडाफोडीचं राजकारण केल्याचा आरोप मनसे डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश भोईर यांनी केलेला आहे. महापौर दिला तरी आज खड्डे आहेत, उद्याही खड्ड्यात रस्ते बनतील का असा सवाल भोईर यांनी केला आहे.
महापौर कोणाचा बसेल हे जनताच ठरवेल
महापौर कोणाचा बसेल हे जनताच ठरवेल. भाजप-शिंदे गटात समन्वय नाही त्यांच्यात परस्परांत,हेवेदावे सुरू आहेत असा टोला ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी लगावला आहे. ‘शिवसेना-भाजप युती आहे, पण कल्याण-डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आम्ही लोकांशी कामाच्या माध्यमातून जोडलेलो आहोत. प्रत्येक पक्षाला महापौर आपलाच वाटतो, त्यात चुकीचं नाही” असं शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी सांगत त्यांनी आपला दावा मजबूत केला आहे.यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीआधी महापौरपदावरून रंगलेली ही चुरस अजून तीव्र होण्याची चिन्हं आहेत.
