प्रकाश आंबेडकरांकडून 12 जागांची मागणी, आघाडीकडून 4 जागांचा प्रस्ताव

प्रकाश आंबेडकरांकडून 12 जागांची मागणी, आघाडीकडून 4 जागांचा प्रस्ताव

मुंबई: लोकसभेसाठी 12 जागा मागणाऱ्या भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. प्रकाश आंबेडकरांनी काल झालेल्या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे  12 जागांची मागणी केली होती.  मात्र आंबेडकरांची ही मागणी अवाजवी असल्याचं म्हणत काँग्रेसने त्याला स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांना चार जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी 12 जागां नव्हे तर चार जागा देण्यासाठी इच्छुक आहे. काँग्रेसकडून दोन तर राष्ट्रवादीकडून दोन जागा देण्याची तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे यामध्ये अकोल्याच्या जागेचाही समावेश आहे. मात्र सोलापूरची जागा सोडण्यास काँग्रेस नकार असून, ती जागा काँग्रेस आपल्याकडेच ठेवणार आहे.

मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने दिलेल्या चार जागांचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना मान्य नाही. यामुळे आता पुढे काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारिप आणि एमआयएम यांच्या बहुजन वंचित विकास आघाडीचा मोठा तोटा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठीच त्यांच्याशी बड्या नेत्यांसोबत बैठका होत आहेत. दरम्यान, प्रकाश आंबेडकर महाआघाडीत जायचं की नाही याबाबत  लवकरच आपली भूमिका  स्पष्ट करणार आहेत.

भाजपविरोधात एकत्र येण्याचा आमचा प्रयत्न आहे. आघाडीच्या नेत्यांच्या प्रस्तावावर वंचित बहुजन विकास आघाडी चर्चा करेल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी काल झालेल्या बैठकीत सांगितले होते.

हे वाचा : 12 जागा हव्या, आंबेडकरांची मागणी, काँग्रेसचा स्पष्ट नकार

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह या निवासस्थानी सोमवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसकडून अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या बैठकीला उपस्थित होते. याच बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी 12 जागांची मागणी केली. या 12 जागांमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. मात्र काँग्रेसकडून 12 जागांसाठी नकार देण्यात आला. आज पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रावादीकडून प्रकाश आंबेडकरांना चार जागांचा प्रस्ताव पाठवण्याता आला आहे.

संबंधित बातम्या

प्रकाश आंबेडकरांना जागा सोडा, मला काहीच नको, ओवेसींचं काँग्रेसला आवाहन 

12 जागा हव्या, आंबेडकरांची मागणी, काँग्रेसचा स्पष्ट नकार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI