‘नये रास्ते की ओर…’ राधाकृष्ण विखे पाटील ‘रिव्हर्स गिअर’ टाकण्याच्या तयारीत?

राधाकृष्ण विखे पाटलांच्या कार्यक्रमस्थळी लावलेल्या एका फ्लेक्सवर 'चलो एक पहल की जाए... नए रस्ते की ओर...' असं लिहिलं होतं.

'नये रास्ते की ओर...' राधाकृष्ण विखे पाटील 'रिव्हर्स गिअर' टाकण्याच्या तयारीत?
अनिश बेंद्रे

|

Feb 19, 2020 | 1:28 PM

अहमदनगर : विरोधीपक्ष नेतेपद सोडून सत्ताधाऱ्यांच्या गोटात सहभागी झालेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा ‘यू टर्न’ मारण्याच्या तयारीत दिसत आहेत. विखे पाटील आता भाजपची साथ सोडून सत्ताधारी महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षात प्रवेश करणार की काय, अशा चर्चा रंगल्या (Radhakrishna Vikhe Patil may take U Turn) आहेत.

भाजप आमदार आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल आपल्या श्रीरामपूरमधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाच्या फ्लेक्स बोर्डावरुन भाजप गायब होती. या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्ह्यातील किंवा राज्यातील कोणतेही नेते उपस्थित नव्हते.

नुकतंच पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचं मुंबईत उद्घाटन झालं, त्यावेळी भाजपचे अनेक नेते हजर राहिले होते. मात्र विखेंच्या ऑफिसच्या उद्घाटनाकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवल्याने भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे, या कार्यक्रम स्थळी लावलेला एक फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. ‘चलो एक पहल की जाए… नए रस्ते की ओर…’ असं या होर्डिंगवर लिहिलं होतं. याचा नेमका अर्थ काय घ्यावा, यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी 4 जून 2019 रोजी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर जुलै महिन्यात ते भाजपमध्ये सहभागी झाले. काही महिने त्यांनी गृहनिर्माण मंत्रिपदाची धुराही सांभाळली. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर ते शिर्डीतून पुन्हा आमदारपदी निवडून आले. मात्र भाजपला सत्ता राखता न आल्याने त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली.

महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विखे पाटील शिवसेनेत होते. त्यामुळे रिव्हर्स गिअर टाकल्यास ते काँग्रेसमध्ये जाणार की शिवसेनेत, याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध नसल्याने राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता नाही.

राधाकृष्ण विखेंचे पुत्र सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीआधी भाजपचा हात धरला होता. ते अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवडून आले आहेत. विखेंनी तेव्हापासूनच फील्डिंग लावल्याने मुलाच्या पाठोपाठ तेही भाजपवासी होतील, अशी अटकळ सुरुवातीपासूनच बांधली जात होती. आता विखेंनी यूटर्न मारल्यास सत्तांतरानंतर भाजपमधून बाहेर पडणारे ते पहिले मोठे नेते (Radhakrishna Vikhe Patil may take U Turn) ठरु शकतात.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें