Raj Thackeray : राज ठाकरे परदेशात, पक्षाचे नेते, प्रवक्त्यांना महत्त्वाची सूचना
आमदार-मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंसोबत मैत्री संपल्याच जाहीर केलय. त्यावर प्रकाश महाजन बोलले आहेत. "खपू गंभीर आहे. वयैक्तीक मैत्री संपुष्टात आणली आहे. मनसे परिवार खूप शोकाकुल झालेला आहे. साहेब इथे नाहीयत, साहेबांच्या घरातील पाळीव प्राणी सुद्धा सगळे अस्वस्थ आहेत"

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या चर्चा सुरु आहेत. विविध वृतवाहिन्यांवर यावर विश्लेषणाचे कार्यक्रम सुरु आहेत. मुंबईत काही ठिकाणी बॅनर्स लागले आहेत. शनिवारपासून ही चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत “महाराष्ट्रापुढे आमच्यातील भांडण, वाद या क्षुल्लक गोष्टी आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं ही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही” असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून अटींसह सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. त्यामुळे राजकारणात परस्परांचे कट्टर विरोधक असलेले हे चुलत बंधू एकत्र येतील का? आणि ते एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल? या चर्चा सुरु झाल्या.
आता राज ठाकरे यांनी आपल्या सर्व नेत्यांना, प्रवक्त्यांना आणि कार्यकर्त्यांना एक महत्त्वाची सूचना केली आहे. राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र येणार का? या संवेदनशील विषयावर बोलणं टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. “काल संध्याकाळी पक्ष नेतृत्वाकडून मला सांगण्यात आलं की, विषय गंभीर आहे. या विषयावर आता कुणीही प्रवक्ता, नेता आणि कार्यकर्त्याने बोलू नये. राजसाहेब 29 एप्रिलला परत येतील, तेव्हा तेच या विषयावर बोलतील. त्यांच्याशिवाय या विषयावर कोणी काही बोलणार नाही” असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सांगितलं.
‘साहेबांच्या घरातील पाळीव प्राणी सुद्धा सगळे अस्वस्थ’
आमदार-मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंसोबत मैत्री संपल्याच जाहीर केलय. त्यावर प्रकाश महाजन बोलले आहेत. “खपू गंभीर आहे. वयैक्तीक मैत्री संपुष्टात आणली आहे. मनसे परिवार खूप शोकाकुल झालेला आहे. साहेब इथे नाहीयत, साहेबांच्या घरातील पाळीव प्राणी सुद्धा सगळे अस्वस्थ आहेत. मनसेचा हा मित्र दूर गेला. ही पोकळी भरुन कशी निघणार? सध्या मी खूपच टेन्शनमध्ये आहे. कारण नसताना, या माणसाला व्यवहार शून्य म्हणावं लागेल. एवढ मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार, मंत्री राहिला, राजसाहेब मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस. त्याच्याशी आता मी मैत्री ठेवणार नाही म्हणतो, याला बौद्धिक दिवाळखोरी म्हणावी लागेल.
