राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंबा देणार?

राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंबा देणार?

मुंबई: लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र निवनिर्माण सेना अर्थात मनसेची अद्याप भूमिकाच स्पष्ट झालेली नाही. मनसे लोकसभा निवडणूक लढणार की नाही हेच अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. येत्या 19 मार्च रोजी हा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात मनसे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृह इथे मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मनसे निवडणूक लढणार की नाही, हे जाहीर करण्यात येईल.

दुसरीकडे राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ताधारी मोदी सरकारविरोधात राज ठाकरे प्रचार करणार आहेत. मनसे पदाधिकारी मेळव्यात ते अधिकृत भूमिका जाहीर करतील.

यापूर्वी आलेल्या वृत्तांनुसार, राज ठाकरे यांच्या मनसेला लोकसभा निवडणुका लढण्यास स्वारस्य नसल्याचं सांगण्यात येत होतं. मनसे केवळ विधानसभाच लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. याबाबतीत खरी भूमिका येत्या 19 मार्चलाच समजू शकेल.

महाआघाडीची दारे बंद?

दरम्यान, राज ठाकरे यांना महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक होती. शिवाय मनसेसाठी कल्याणची एक जागा सोडण्याची तयारीही राष्ट्रवादीने केली होती. मात्र त्याला काँग्रेसचा विरोध होता. अखेर राष्ट्रवादीने आपल्या जागा जाहीर केल्यामुळे मनसेला महाआघाडीची दारे बंद झाल्याचं सध्याचं चित्र आहे.

ही सर्व परिस्थिती पाहता मनसे येत्या निवडणुकीत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published On - 4:11 pm, Sat, 16 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI