काँग्रेसच्या तीन मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी

काँग्रेसच्या तीन मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी

मुंबई : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजयाला गवसणी घातल्यानंतर, आज तीनही राज्यातील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राजस्थानात अशोक गहलोत हे मुख्यमंत्री, तर उपमुख्यमंत्रिपदी सचिन पायलट, मध्य प्रदेशाची धुरा कमलनाथ यांच्याकडे आणि छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल हे राज्याचं नेतृत्त्व करणार आहेत.

राजस्थान

राजस्थानात वसुंधरा राजे यांच्या नेतृत्त्वातील भाजप शासित सरकार उलथवून, काँग्रेसने विजयी पताका फडकवल्या आहेत. अनेक खलबतांनंतर राजस्थानची धुरा अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. गहलोत मुख्यमंत्री, तर पायलट उपमुख्यमंत्री असतील.

राजस्थानात काँग्रेसला 99 जागा, भाजपला 73 जागा, तर अपक्ष आणि इतरांना 27 जागांवर विजय मिळवता आला.

मध्य प्रदेश

गेली 15 वर्षे शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्त्वात भाजपने मध्य प्रदेशवर सत्ता गाजवली. मात्र, अखेर काँग्रेसने मध्य प्रदेशातही भाजपच्या सत्तेला हादरा देत, विजय मिळवला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून निवड काँग्रेसच्या वरिष्ठांनी केली असून, आज त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेसला 114 जागांवर विजय मिळवला आला, तर भजापला 109 आणि इतरांना 7 जागांवर विजय मिळाला आहे.

छत्तीसगड

छत्तीसगडची सत्ताही काँग्रेसने भाजपच्या हातातून खेचून आणली. तिथे काँग्रेसला 90 पैकी तब्बल 68 जागा मिळाल्या असून, भाजपला केवळ 15 आणि इतरांना 7 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसचे नेते भूपेश बघेल हे छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री असतील.

Published On - 9:02 am, Mon, 17 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI