उदयनराजे राज्यसभेच्या रेसमध्ये, कोणाचं तिकीट कापणार?

रामदास आठवले यांचं राज्यसभा सदस्यत्व मार्च महिन्यात संपत असून भाजपच्या कोट्यातून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणं कठीण मानलं जात आहे

उदयनराजे राज्यसभेच्या रेसमध्ये, कोणाचं तिकीट कापणार?

नवी दिल्ली : माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली भाजपने सुरु केल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale Rajyasabha MP) यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. रामदास आठवले यांचं राज्यसभा सदस्यत्व मार्च महिन्यात संपत आहे. मात्र भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी मिळणं कठीण मानलं जात आहे. खासदारकी गमवावी लागल्यास आठवलेंना केंद्रीय मंत्रिपदावरही पाणी सोडावं लागू शकतं.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात राज्यसभेच्या सात जागांची मुदत संपणार आहे. यावेळी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

राष्ट्रवादीचे शरद पवार, अ‍ॅड. माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे.

राज्यसभेसाठी खुले मतदान असल्याने आघाडीचे पाच आणि भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून जाऊ शकतात. मात्र निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार दिल्यास सातव्या जागेसाठी सामना रंगणार आहे.

राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

उदयनराजेंचा दणदणीत पराभव

राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या उदयनराजेंचा लाखोंच्या मताधिक्याने विजय झाला होता. मात्र निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांत उदयनराजेंनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती धरला. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती.

राष्ट्रवादी विरुद्ध उदयनराजे अशी झालेली ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. मात्र भाजपच्या तिकीटावर उतरलेल्या उदयनराजेंना पोटनिवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला. उदयनराजे यांचा 87 हजार 717 मतांनी पराभव करत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील लोकसभेवर निवडून गेेले.

Ramdas Athawale Rajyasabha MP

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI