उद्धव ठाकरेंची घोषणा प्रत्यक्षात येण्यास सुरुवात, पहिलं विभागीय मुख्यमंत्री ऑफिस सुरु

नवी मुंबईत बेलापूर येथील कोकण भवनमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती विभागीय महसूल उपायुक्त सिद्धाराम शालीमठ यांनी दिली.

  • सुरेश दास, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 15:00 PM, 20 Jan 2020
उद्धव ठाकरेंची घोषणा प्रत्यक्षात येण्यास सुरुवात, पहिलं विभागीय मुख्यमंत्री ऑफिस सुरु

नवी मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषणा केल्यानुसार जिल्हा पातळीवर मुख्यमंत्री कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात नवी मुंबईतून (CMO Navi Mumabi) झाली आहे. नवी मुंबईत (CMO Navi Mumabi) बेलापूर येथील कोकण भवनमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती विभागीय महसूल उपायुक्त सिद्धाराम शालीमठ यांनी दिली.

सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, सरकारस्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवदने, मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात स्वीकारून त्यावर कार्यवाहीसाठी संबंधीत क्षेत्रीय स्तरावरील सरकारी यंत्रणेकडे पाठविण्यात येतात. यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि  गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरु करण्यात आलं आहे.

उपायुक्त (महसूल) हे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय म्हणून काम पाहणार असून, एक नायब तहसीलदार, एक लिपिक/लिपिक टंकलेखक ही पदे काम पाहणार आहेत. विभागीय स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालयाच्या क्षेत्रीय कक्षात (सीएमओ) सर्वसामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ याबाबतची पोचपावती संबंधितांना दिली जाणार आहे.

ज्या अर्जावर किंवा संदर्भावर क्षेत्रीय स्तरावरच कार्यवाही अपेक्षित आहे, असे सर्व अर्ज, विभागाच्या नियंत्रणाखालील संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे त्वरित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. तसेच या कक्षामध्ये प्राप्त होणारे एकूण अर्ज, उचित कार्यवाहीसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेले अर्ज, त्यासंदर्भात करण्यात आलेली कार्यवाही, प्रलंबित अर्ज इत्यादी सर्व बाबींचा मासिक अहवाल सरकारला देण्यात येणार आहे.

कोकण विभागातील नागरिकांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, पहिला मजला, कोकण भवन, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय उपायुक्त(महसूल) सिद्धाराम शालीमठ यांनी केले आहे.