रॉबर्ट वाड्रा काँग्रेसचा प्रचार करणार, स्मृती इराणी म्हणतात…

रॉबर्ट वाड्रा काँग्रेसचा प्रचार करणार, स्मृती इराणी म्हणतात...

नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुका 2019 साठी राजकीय पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यातच आता काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे काँग्रेससाठी प्रचार करणार असल्याची माहिती आहे. रविवारी स्वत: रॉबर्ट वाड्रा यांनी याची कबुली दिली. ते लोकसभा निवडणुकांध्ये काँग्रेससाठी संपूर्ण देशात प्रचार करणार आहेत. तसेच ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळीही ते उपस्थित असणार आहेत. राहुल गांधी हे 10 एप्रिलला अमेठी मतदारसंघातून, तर सोनिया गांधी या 11 एप्रिलला रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतील.

रॉबर्ट वाड्रा हे प्रचार करणार, यावर भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी काँग्रेसवर निशाणा साधला. “मला फक्त इतकं म्हणायचं आहे की, जिथेही रॉबर्ट वाड्रा हे प्रचारासाठी जाऊ इच्छितात, तिथल्या जनतेने जरा सावध व्हावं आणि आपल्या जमीनी वाचवाव्या”, असे म्हणत स्मृती इराणींनी रॉबर्ट वाड्रा यांची खिल्ली उडवली. स्मृती इराणींनी रॉबर्ट वाड्रा यांना जमीनींवर प्रेम करणारा व्यक्ती म्हणून संबोधलं. रॉबर्ट वाड्रा यांच्यावर लंडनमध्ये 19 लाख पाउंड म्हणजेच जवळपास 17 कोटींचा बंगला विकत घेण्यासाठी काळ्या पैशांचा वापर केल्याचा आरोप आहे.

रॉबर्ट वाड्रा हे सध्या मनी लॉड्रिंग प्रकरणी जामीनावर बाहेर आहेत. दिल्लीच्या एका न्यायालयाने यासंबंधी विना परवानगी त्यांना देश न सोडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्यांना पुराव्यासोबत छेडछाड तसेच साक्षीदारांवर दबाव न आणण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, तपास अधिकारी बोलवतील तेव्हा त्यांना हजर होण्याचेही आदेश दिले आहेत.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI