‘महाराष्ट्राप्रती खरंच कळवळा असता तर जीएसटीचे पैसे मागितले असते’, रोहित पवारांचा भाजप नेत्यांवर निशाणा

"भाजपने उद्या मंदिरं खुली करण्यासाठी जे आंदोलन आयोजित केलं आहे ते राजकारण डोक्यात ठेऊनच केलं असणार", अशी टीका रोहित पवार यांनी केली (Rohit Pawar slams Maharashtra Bjp leaders).

'महाराष्ट्राप्रती खरंच कळवळा असता तर जीएसटीचे पैसे मागितले असते', रोहित पवारांचा भाजप नेत्यांवर निशाणा

अहमदनगर : “आपल्या राज्यासाठी आणि लोकांसाठी राज्यातील भाजप नेत्यांनी एकदाही केंद्र सरकारकडे आवाज उठवला नाही. तसं कदाचित त्यांच्या धोरणात असेल किंवा भीतीपोटी केंद्राविषयी त्यांच्यातला कुठलाही नेता बोलू शकत नाही”, असा टोला कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला (Rohit Pawar slams Maharashtra Bjp leaders).

रोहित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत विरोधी पक्षावर सडकून टीका केली. “भाजप कुठल्याही विषयात राजकारण करु शकतं, हे सर्वांना माहिती आहे. भाजपने उद्या मंदिरं खुली करण्यासाठी जे आंदोलन आयोजित केलं आहे ते राजकारण डोक्यात ठेऊनच केलं असणार”, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

“मंदिर संबंधित काही आर्थिक कारणांचा विचार करुन मंदिरं खुली करावीत, असं माझं मत होतं. मात्र, मंदिराचा गाभारा लहान असतो. अशा परिस्थितीत लोक भावूक झाले आणि गर्दी वाढली तर त्यांच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो. यावर आता राज्य सरकार काय निर्णय घेईल ते पाहुया”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी यावेळी दिली.

“भाजप नेत्यांना खरच महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोकांबद्दल कळवळा असता तर जीएसटीचे पैसे अनेक महिन्यांपासून केंद्र सरकारकडे अडकले आहेत. ते पैसे त्यांनी मागितले असते”, असा टोला रोहित पवार यांनी लगावला (Rohit Pawar slams Maharashtra Bjp leaders).

“राज्यात भाजपची सत्ता होती त्यावेळी त्यांनी एलबीटी घाईघाईने रद्द केला. त्यामुळे गेल्या पाच वर्षात 26 हजार कोटींचं नुकसान झालं. त्यासाठी त्यांनी एकदाही पाठपुरावा केला नाही. हा पैसा जर आपल्याला मिळाला असता तर आरोग्य आणि इतर गोष्टींसाठी तो खर्च करता आला असता. मात्र ते भाजप आहे. त्यांना राजकारणच सुचतं”, असा घणाघात रोहित पवार यांनी केला.

यावेळी रोहित पवार यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नांवरही प्रतिक्रिया दिली. “सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांबद्दल काही चांगल्या गोष्टी बोलल्या. ते देवेंद्र फडणवीस यांना पटलेलं दिसत नाही. मुंबई पोलिसांनी जे योग्य करायला पाहिले होतं ते केलं, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे. मात्र महाराष्ट्रात काही लोकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला म्हणून ही केस सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला”, असं रोहित पवार म्हणाले. त्याचबरोबर ड्रग्ज प्रकरणात जे दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.

हेही वाचा : Maratha Reservation | आतापर्यंत 10 मराठा मुख्यमंत्री, अनेकांचे साखर कारखाने, आरक्षण चुकीचं : गुणरत्न सदावर्ते

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI