“बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे नामुष्की सरकार!”, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर सामनातून प्रखर टीका

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

|

Updated on: Aug 13, 2022 | 7:06 AM

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर सामनातून प्रखर टीका करण्यात आली आहे. "बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे नामुष्की सरकार!", असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे नामुष्की सरकार!, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर सामनातून प्रखर टीका

मुंबई : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) देवेंद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadnavis) जात सरकार स्थापन केलं किंबहुना त्यांच्या बंडापासूनच शिंदेगटाच्या एक ना एक हालचालीवर शिवसेनेतून प्रखर शब्दात टीका केली जात आहे. अश्यात नुकतंच सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. पण खातेवाटप अद्याप झालेलं नाही. त्यावर आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) टीका करण्यात आली आहे. “बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे नामुष्की सरकार!” या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख लिहिण्यात आलाय. “3 दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार बिनमंत्र्यांचे होते. 40 दिवसांनंतर कसाबसा मंत्रिमंडळाचा पाळणा हलला. दोन्हीकडच्या ‘नाकीनऊ’ अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्याला तीन दिवस उलटले तरी खातेवाटपाचे ‘बारसे’ होऊ शकलेले नाही. कारण हे सरकार ‘संधीसाधूं’चे आहे. ज्यांना मंत्रिमंडळात ‘संधी’ मिळाली ते ‘साधू’ बनल्याचे ढोंग करीत आहेत आणि मलईदार खात्यापासून हवा तसा बंगला मिळावा यासाठी रस्सीखेच करीत आहेत. त्यामुळे बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

अग्रलेखात काय?

शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पाळणा 40 दिवसांनंतर हलला खरा, पण आता त्याचे खातेवाटप लटकले आहे. मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन दिवस उलटले आहेत. देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन तोंडावर आला आहे; पण राज्याच्या मंत्रिमंडळाचे ना खातेवाटप झाले आहे ना जिल्हय़ा-जिल्हय़ांचे पालकमंत्री ठरले आहेत. आधी मंत्रिमंडळ विस्ताराला 40 दिवस लागले; आता त्यातील खातेवाटपासाठीही घोळात घोळ सुरू आहे. 40 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा पाळणा हलला तेव्हा या पाळण्याची दोरी नेमकी कोणाकडे आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. मात्र या पाळण्याला अनेक दोन्या आहेत आणि त्या आतल्या बाहेरच्या अशा अनेकांच्या हातात आहेत असे दिसत आहे. जे पाळण्यात आहेत ते त्यांना हव्या असलेल्या खात्यांसाठी, तर ज्यांना पाळण्यात जागा मिळालेली नाही ते नाराजी व्यक्त करण्यासाठी हातातील दोरीचा ‘झटका’ देत आहेत. शिंदे गटाला समर्थन देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही दोन दिवसांपूर्वी असाच झटका दिला होता. बच्चू कडू हे ज्येष्ठ अपक्ष आमदार आहेत. आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्येही ते मंत्री होते. मात्र शिंदे गटाने बंडखोरी केली तेव्हा त्यांना सुरुवातीपासून साथ देणाऱ्या अपक्ष आमदारांत ते अग्रेसर राहिले. त्यामुळे नव्या सरकारच्या पहिल्या पाळण्यात आपल्यालाही जागा मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही. त्यामुळे ते नाराज झाले.

हे सुद्धा वाचा

‘कडू’ सत्य

या दोघांनी मिळून बनविलेले सरकार ‘धोका देणाऱ्यांचे च आहे. बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाचा पाळणा हलला असता तर त्यांना या ‘धोक्याचा साक्षात्कार कदाचित झाला नसता; पण तसे झाले नाही आणि शिंदे-फडणवीस सरकारचे ‘कडू’ सत्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडले. अर्थात असे अनेक दुखी आणि ‘सुप्त ज्वालामुखी’ शिंदे-फडणवीस सरकारात आहेत आणि त्यांचे कधी स्फोट होतील याचा काहीच भरवसा नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होऊनही अद्यापि खातेवाटप होऊ शकलेले नाही. ही नामुष्कीच आहे. मुळात हे सरकारच अशा अनेक सुप्त ज्वालामुखींच्या तोंडावर बसले आहे. त्यापैकी कुठल्या ना कुठल्या सुप्त ज्वालामुखीचा उद्रेक, त्याचे हादरे, लाव्हारसाचे चटके या सरकारला अधूनमधून बसणारच आहेत. त्यातील पहिला हादरा सरकार समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी दिला. शिवाय ज्या मुद्दय़ांसाठी आपण शिंदे गटाला समर्थन दिले आहे ते बाजूला पडले तर वेगळा विचार करू, असे ‘गुद्दे’ ही सरकारला लगावले. 3 दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार बिनमंत्र्यांचे होते. 40 दिवसांनंतर कसाबसा मंत्रिमंडळाचा पाळणा हलला. दोन्हीकडच्या ‘नाकीनऊ’ अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्याला तीन दिवस उलटले तरी खातेवाटपाचे ‘बारसे’ होऊ शकलेले नाही. कारण हे सरकार ‘संधीसाधूं’चे आहे. ज्यांना मंत्रिमंडळात ‘संधी’ मिळाली ते ‘साधू’ बनल्याचे ढोंग करीत आहेत आणि मलईदार खात्यापासून हवा तसा बंगला मिळावा यासाठी रस्सीखेच करीत आहेत. त्यामुळे बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI