अजितदादांच्या धक्क्याने भाजपात खळबळ, ऐन निवडणुकीत टाकला मोठा डाव; नेमकं काय घडलं?
अजित पवार यांनी भाजपावर मोठा पलटवार केला आहे. ऐन महापालिका निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपाला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आता राजकीय गणित बदलणार आहे.

Sandip Waghere : नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार कामगिरी केली. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना मात्र या निवडणुकीत फारशा जागा जिंकता आल्या नाहीत. ही निवडणूक संपताच आता राज्यात महापालिकेच्या निविडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. राज्यात एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष पूर्ण ताकद लावत आहेत. अन्य पक्षातील बलशाली नेत्यांना स्वत:च्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड यासारख्या शहरांत तर अनेक नेत्यांनी सोईच्या पक्षात प्रवेश केला आहे. असे असतानाच आता पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. पिंपरी चिंचवडमधील ताकदवान नेता अजित पवार यांच्या पक्षाच्या गळाला लागला आहे.
नेमका कोणाचा प्रवेश झाला?
पिंपरी – चिंचवडमधील भाजपाचे माजी नगरसेवक संदीप वाघीरे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी अजित पवार स्वत: उपस्थित होते. हा पक्षप्रवेश म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा भाजपावर पलटवारच असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे संजोग वाघेरे यांनी भाजपात प्रवेश केला होता. संजोग वाघेरे हे भाजपात आल्याने संदीप वाघेरे नाराज होते. त्यामुळेच आता संदीप वाघेरे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
संदीप वाघेरे कोण आहेत?
संदीप बाळकृष्ण वाघिरे हे 2017 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले होते. ते पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे राजकीय विरोधक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. संजोग वाघेरे लोकसभेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून उभे होते. त्यावेळी संदीप वाघेरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांचा प्रचार करत त्यांना पिंपरी गावातून मोठे मताधिक्य दिले होते. त्यामुळे संजोग वाघेरे आणि संदीप वाघेरे हे राजकीय विरोधक आहेत. त्यातच संजोग वाघेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संदीप वाघेरे नाराज होऊन आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला.
