मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर संजय निरुपम म्हणतात….

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:38 PM, 26 Mar 2019
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर संजय निरुपम म्हणतात....

मुंबई : मुंबई काँग्रेसमधील गटबाजी कमी झालेली नाही, असा आरोप मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज झाललेल्या पत्रकार परिषदेत केला. संजय निरुपम यांना काँग्रेसकडून उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देत त्यांना मुंबई अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. मुंबई काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या गटबाजीमुळे पक्षातील अनेक वाद चव्हाट्यावर आले होते. याच पार्श्वभूमीवर निरुपम यांना पदावरुन हटवण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. निरुपम यांच्या जागी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांना मुंबई अध्यक्ष पद देण्यात आलं आहे.

“उमेदवारी देताना मला मुंबई अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. पण गेल्या साडेचार वर्षात पदावर राहून अनेक नेत्यांना भेटलो. त्यांच्यासोबत काम केलं, विरोध होऊनही लोकांमध्ये राहिलो. मात्र मुंबई काँग्रेसमधील गटबाजी कमी झाली नाही. हायकमांडलाही याबद्दल माहित आहे. मला आता पदावरुन हटवल्यानतंर गटबाजी कमी होईल आणि दिल्लीला तक्रार जाणार नाही” अशी आशा यावेळी निरुपम यांनी व्यक्त केली.

निरुपम म्हणाले, “काँग्रेस उमेदवार म्हणून तिकीट दिल्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो. उत्तर पश्चिम मतदारसंघातून मला लढण्याची इच्छा होती. हे माझं स्वप्न प्रत्यक्षात आलं आहे. सर्वांच्या आशिवार्दानं मी या मतदारसंघातून लोकसभेत जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला”.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसमधून लढणार?

गेले काही दिवस उर्मिला मातोंडकर या लोकसभा निवडणुकीत उभे राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर निरुपम यांना पत्रकारांनी विचारले असता निरुपम म्हणाले, उर्मिला मातोंडकरांच्या नावाची चर्चा आहे. याबाबत चर्चा करुन लवकरच निर्णय होईल.