तीन आमदारांना ठार मारण्याचा कट होता, एकाला इंजेक्शन देऊन, दुसऱ्याच्या अंगावर ट्रक… राऊत यांचा मोठा दावा
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुरतला गेलेल्या तीन आमदारांना ठार मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक दावा केला आहे. एका आमदाराला इंजेक्शन देऊन, तर दुसऱ्याच्या अंगावर ट्रक घालून मारण्याचा प्रयत्न होता असे राऊत म्हणाले. यात नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांच्या नावांचा उल्लेख करत, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी धक्कादायक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरतहून परतणाऱ्या एका आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. शिरसाट यांच्या या गौप्यस्फोटाने मोठी खळबळ उडालेली आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. एक दोन नव्हे तर सुरतला गेलेल्या तीन आमदारांना ठार मारण्याचा कट होता. एकाला इंजेक्शन देऊन मारण्यात येणार होतं. तर दुसऱ्याच्या अंगावर ट्रक घालण्यात येणार होता, असा खळबळजनक दावाच राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी केलेल्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. तसेच या तिन्ही आमदारांची नावेही राऊत यांनी जाहीर केली आहेत. सुरतहून परत येणाऱ्या तीन आमदारांना ठार मारण्याचा कट होता. आता मंत्री असलेले प्रकाश आबिटकरही परत येणार होते. त्यांनी सुरुवातीला परत येण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्यावर दबाव आला आणि त्यांना अडकवून ठेवलं गेलं. नितीश देशमुख यांना हार्ट अटॅक येईल अशा प्रकारचे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि इंजेक्शन देण्यात आले होते. ते कसे मारले जातील हा डाव होता. हा एक कट होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न
कैलास पाटीलही सुरतहून पळून जात होते. तेव्हा त्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. अप्रत्यक्षपणे शिरसाट यांनी तेच सांगितलं. माझ्याकडे हे तीन उहादरण आहेत. अकोल्याचे नितीन देशमुख यांनी तिथून पळ काढला. ते बाहेर पडले संघर्ष करून. कैलास पाटील काही मैल चालत आले. त्यांच्या जीवाला अपाय करण्याची शक्यता होती. तरीही ते आले. हे तीन प्रकरण माहीत आहेत. बाकीच्यांना इतर आमदारांना जबरदस्तीने कोंडून ठेवलं, असा दावाही राऊत यांनी केला.
