देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर स्वागत : संजय राऊत

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम |

Updated on: Oct 30, 2019 | 8:02 PM

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Government Formation) यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांचं स्वागत करू, असं विधान केलं आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर स्वागत : संजय राऊत

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Government Formation) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपला टोला लगावला आहे. भाजपकडे 145 आमदारांचं संख्याबळ असेल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांचे स्वागत करू, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं. त्यामुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेनेची भूमिका काहीशी नरमल्याचंही या निमित्ताने बोललं जात आहे.

संजय राऊत म्हणाले, “ज्या पक्षाकडे 145 आमदारांचं बहुमत आहे त्यांनी मुख्यमंत्री कोण हे ठरवावं. आम्ही त्यांचं स्वागत करतो. भाजपकडे जर संख्याबळ असेल तर त्यांनी सत्तास्थापन करावी. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आम्ही त्यांचं स्वागत करू. विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे त्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करावा. मात्र, कुणीही सत्तास्थापनेचा दावा केला, तरी त्यांना बहुमत सिद्ध करावंच लागेल.”

यावेळी राऊत यांनी युतीचंच सरकार स्थापन होणार असं म्हणत फक्त ठरल्याप्रमाणे सत्तेची विभागणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही, तोपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ऑफर देण्याच्या गोष्टी करत राहतील. मात्र, आम्ही आजही भाजपसोबत युतीत आहोत. मुख्यमंत्री फडणवीसांनी सरकार युतीचं स्थापन होणार असं म्हटलं आहे. फक्त ठरल्याप्रमाणे सत्तेची विभागणी व्हावी, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर या केवळ अफवा असल्याचं राऊत म्हणाले. ते म्हणाले, “जर असं कुणी म्हणत असेल तर ते आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे इतर प्रमुख नेते संपर्कात असल्याचं म्हणायचेच बाकी आहे. या सर्व अफवा आहेत. जर असं असेल तर माझ्याही संपर्कात भाजपचे 60 आमदार आहेत. त्यांचे सकाळपासून फोन आले आहेत आणि ते सत्ता स्थापनेविषयी विचारत आहेत.”

ठरल्याप्रमाणे सत्तावाटप झाले तर 5 वर्ष महाराष्ट्रात स्थिर सरकार असेल, असंही राऊत यांनी सुचकपणे सांगितलं.

“शरद पवारांच्या झंझावाताची झलक अजित पवारांच्या भाषणात”

संजय राऊत यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांचंही कौतुक केलं. ते म्हणाले, “मी अजित पवारांचं भाषण ऐकलं. त्यांनी एका राजकीय नेत्याप्रमाणे आपलं भाषण केलं. शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारामुळे राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं. त्याचीच झलक अजित पवार यांच्या भाषणात दिसली.”

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI