मी आणि शरद पवारांनी सोबत बसून मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक शब्द ऐकला : संजय राऊत

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut on resignation of Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

मी आणि शरद पवारांनी सोबत बसून मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक शब्द ऐकला : संजय राऊत

मुंबई: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut on resignation of Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मी आणि शरद पवार यांनी सोबत बसून देवेंद्र फडणवीस यांचा प्रत्येक शब्द ऐकला, असं यावेळी संजय राऊत यांनी (Sanjay Raut on resignation of Devendra Fadnavis) सांगितलं. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (8 नोव्हेंबर) राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका व्यक्त केली. यावर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे आणि सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळे राजीनामा द्यावा लागतो. मी आणि शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण पत्रकार परिषद आणि त्यातील प्रत्येक शब्द ऐकला. यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील.”

शिवसेनेमुळे कोणतीही चर्चा थांबलेली नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची चर्चा झालेली नसल्याचं देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अशी चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपनं त्यांच्या विचारधारेच्या विरुद्ध विचारधारेशी युती केली आहे. मोदींवर टीका करणाऱ्यांसोबत युती करुन मांडीला मांडी लावली आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेबद्दल असं बोलू नये, असंही राऊत यांनी नमूद केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:

  • गेले पाच वर्ष मला महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी महाराष्ट्रातील सर्व जनतेचे आभार मानतो.
  • महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ आणि अतिवृष्टी या वेगवेगळ्या संकटांमुळे अडचणीत सापडला. त्यावेळी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहिलं.
  • गेल्या 5 वर्षात आम्ही शहर आणि गाव अशा प्रत्येक ठिकाणी विकास केला. राज्यात अजून अनेक समस्या आहेत. या समस्या पाच वर्षात संपतील असं नाही. पण गेल्या पाच वर्षात राज्यात मोठं काम झालं आहे.
  • लोकसभेत जनतेने आम्हाला बहुमत दिले. विधानसभेलाही जनेतेने आम्हाला साथ दिली. आमच्या महायुतीला संपूर्ण बहुमत दिले. 160 पेक्षा अधिक जागा आम्हाला मिळाल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. त्यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेचे खूप आभार मानतो.
  • उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिली पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी सरकार बनवण्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, असं वक्तव्य केलं. त्यामुळं आम्हाला धक्का बसला. जनतेने आम्हाला महायुती म्हणून मतदान केले होते. त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य का केलं हा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला.
  • खरंतर अडीच वर्षांच्या विषयावर माझ्यासमोर काहीही ठरलेलं नव्हतं. उद्धव ठाकरे किंवा अमित शाह यांच्यामध्ये यावर काही चर्चा झाली असेल तर मला माहिती नाही. मात्र, अमित शाह यांना विचारलं असता यावर निर्णय झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं.
  • सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने जी भूमिका मांडली ती खोटी आणि चुकीची नाही. यातून काही गैरसमज झाले असतील, तर त्यासाठी चर्चा करणं गरजेचं आहे. पण शिवसेना चर्चा करण्यास तयार नाही.
  • गेल्या पाच वर्षात मी अनेकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. मी स्वत: उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यांनी तो घेतला नाही. आम्ही चर्चा थांबवली नसून शिवसेनेकडून चर्चा थांबवली गेली. चर्चेची दारं आमच्यासाठी खुली आहेत.
  • आमच्यासोबत चर्चा करायला शिवसेनेला वेळ नाही. पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत चर्चा करायला वेळ आहे. शिवसेनेकडे रोज तीन वेळा काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा करायला वेळ आहे.
  • त्यांच्या आजूबाजूचे लोक आहेत. ते ज्या प्रकारची वक्तव्य करत आहेत. त्यामुळे सरकार होणार नाही. त्यामुळे फक्त माध्यमांमध्ये जागा मिळेल. असं कुणी समजू नये आम्हाला उत्तर देता येत नाही. आम्हालाही उत्तर त्या भाषेत देता येतात. पण आम्ही लोक तोडणारे नसून लोकांना जोडणारे आहोत.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI