लहान मुलाबरोबर कुस्ती खेळल्यावर पैशांऐवजी रेवड्या मिळतात, पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Devendra Fadnavis) यांनी नाशिकमधील प्रचारसभेत पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पहिलवानाच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

लहान मुलाबरोबर कुस्ती खेळल्यावर पैशांऐवजी रेवड्या मिळतात, पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Devendra Fadnavis) यांनी नाशिकमधील प्रचारसभेत पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पहिलवानाच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. कुस्ती कुणासोबत खेळायची हे ठरवावं लागतं. लहानमुलांसोबत कुस्ती खेळल्यास पैशांऐवजी रेवड्या मिळतात, असं म्हणत पवारांनी फडणवीसांना (Sharad Pawar on Devendra Fadnavis) कोपरखळी लगावली. ते पिंपळगाव बसवंत येथे महाआघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते. सभेतील गर्दी बघून निफाडची जागा यावेळी महाआघाडीचा उमेदवार नक्की जिंकेल, असंही त्यांनी नमूद केलं.

शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणाले आमचा पहिलवान तेल लावून तयार आहे. मात्र, कुस्ती खेळतांना कुणासोबत कुस्ती खेळायची हे ठरवायचं असतं. लहानपणी जत्रेत कुस्ती खेळायचो. तेव्हा पैशांऐवजी रेवड्या द्यायचे. त्यामुळे लहान मुलांबरोबर कुस्ती खेळावी का हे ठरवावे लागते.” मी राज्याच्या सगळ्या कुस्ती संघांचा अध्यक्ष आहे आणि क्रिकेटचाही जगाचा अध्यक्ष राहिलो आहे, असंही पवारांनी यावेळी नमूद केलं.

‘… म्हणून मी ईडीकडे चौकशीला जाण्याचा निर्णय घेतला’

शरद पवार यांनी आपल्या भाषणात ईडीकडे स्वतःहून चौकशीला जाण्याचा निर्णय घेण्यामागील कारणही सांगितलं. ते म्हणाले, “जर मी निवडणुकीच्या प्रचारात अडकून ईडीच्या चौकशीला गेलो नसतो, तर दुसऱ्या दिवशी शरद पवार फरार अशा बातम्या आल्या असत्या. त्यानंतर यांनी मला फरार घोषित केले असते. हे टाळण्यासाठीच मी ईडीकडे गेलो.” मला नोटीस आल्यानंतर अनेक ठिकाणांहून लोकं गाड्या भरून आले होते. त्यावेळी सरकार हललं होतं. राज्य चालवण्याची अशी पद्धत नसते. सत्ता आल्यावर डोकं जागेवर आणि पाय जमिनीवर ठेवायचं असतं, असंही पवारांनी नमूद केलं.

‘मोदी सभेसाठी जिथं उभे राहिले ते स्टेडियम पवारांनी बांधलं’

शरद पवारांनी काय केलं या मोदींच्या प्रश्नावर शरद पवारांनी चांगल्याच कोपरखळ्या दिल्या. ते म्हणाले, “मागे एका सभेत शरद पवार यांनी काय केलं, असा प्रश्न मोदींनी विचारला. त्यावर खाली बसलेलं एक पोरगं उठलं आणि त्याने मोदींना या प्रश्नाचं उत्तर दिलं. ते म्हणालं, तुम्ही जिथं उभे आहात ते स्टेडियम पवारांनी बांधलं आहे.”

मी स्वतः सत्तेत जाणार नाही : शरद पवार

शरद पवार यांनी प्रचारसभेत आगामी काळातील त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी मोठी घोषणा केली. मी स्वतः सत्तेत जाणार नाही, मात्र तुमच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सत्तेवर अंकुश ठेवेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

शरद पवार म्हणाले, “राज्यातील साखर कारखाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना दुसरीकडे ऊस द्यावा लागतो आहे. तेथेही शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्यानं हातात काहीच येत नाही. राज्य सहकारी बँकेने साखर कारखान्यांना अडचणीच्या काळात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.” भाजप जाहीरनाम्यात 2 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ असं आश्वासन देत आहे. मात्र, त्यांच्या काळात नव्या नोकऱ्या तयार होण्याऐवजी आहे त्या नोकऱ्या जात आहेत. त्यामुळे त्यांनी आधी आहे त्या नोकऱ्या वाचवाव्यात. या सरकारच्या धोरणामुळेच आज बेरोजगारी वाढली आहे, असाही आरोप पवारांनी केला.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भाजपने राज्यातील नेत्यांसोबतच केंद्रातील अनेक मंत्र्यांना प्रचारात उतरवलं आहे. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. दुसरीकडे विरोधीपक्षांमध्ये शरद पवारांनी आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे निवडणुकीत जनता कुणाच्या बाजूने निकाल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI