मोदींकडून तब्येतीची चौकशी, शरद पवारांची 2 शब्दांत प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
तप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. ऑपरेशन सिंदूरसंदर्भात भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी खासदारांचं एक शिष्टमंडळ परदेशवारीला गेलं होतं.

Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. ऑपरेशन सिंदूरसंदर्भात भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी खासदारांचं एक शिष्टमंडळ परदेशवारीला गेलं होतं. यात खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश होता. हे शिष्टमंडळ भारतात परतल्यानंतर मोदी आणि या खासदारांत चर्चा झाली. यावेळी मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवार यांच्या तब्येतीविषयी चौकशी केली. यावरच आता खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अवघ्या दोन शब्दांत दिली प्रतिक्रिया
शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. पत्रकारांनी त्यांना नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे तुमच्या प्रकृतीची चौकशी केली आहे, त्याबाबत तुमचे मत काय? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना त्यांनी अवघ्या दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी माझी चौकशी केली असेल तर ठिक आहे, त्यांचा आभारी आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
शरद पवार यांच्या पक्षाची वेगळी भूमिका
काही दिवसांपूर्वी ऑपरेशन सिंदूरप्रकरणी विरोधकांनी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमकं काय घडलं? सरकारने नेमकं काय केलं? हे मोदी सरकारने सांगावे. विरोधकांना विश्वासात घेण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विरोधकांनी केली होती. त्यासाठी वेगवेगळ्या विरोधी पक्षांनी मोदी यांना पत्रही लिहिले होते. शरद पवार यांच्या पक्षाने मात्र वेगळी भूमिका घेतली होती. सध्या विशेष अधिवेशन बोलवणे योग्य नाही. आपण एकजूट आहोत हा संदेश जाणे गरजेचे आहे असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.
पवारांच्या पक्षात बदलाचे वारे
दरम्यान, राष्ट्रवादी ( शरद पवार गट) पक्षात बदलाचे मेोठे वारे वाहात आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला जबाबदारीतून मुक्त करून नव्या नेतृत्त्वाला संधी द्या, अशी भावना व्यक्त केली आहे. त्यानंतर आता नव्या प्रदेशाध्यक्षांचा शोध घेतला जाईल, असे शरद पवार यांनी म्हटलंय त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
