बाळासाहेबांचा ‘जनाब’ उल्लेख म्हणजे वैचारिक सुंता, कॅलेंडरवरुन भाजपचा शिवसेनेवर हल्ला

शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये (Shiv Sena Urdu calendar) बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब (Janab) असा करण्यात आला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:22 PM, 1 Jan 2021
बाळासाहेबांचा 'जनाब' उल्लेख म्हणजे वैचारिक सुंता, कॅलेंडरवरुन भाजपचा शिवसेनेवर हल्ला
बाळासाहेब ठाकरे यांचा जनाब असा उल्लेख

मुंबई : शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये (Shiv Sena Urdu calendar) बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब (Janab Balasaheb Thackeray) आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उल्लेख ‘शिवाजी जयंती’ असा केल्याने, भाजपने हल्लाबोल केला. “शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही”, असा हल्लाबोल भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी केला.

अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अतुल भातखळकर म्हणाले, “शिवसेनेने एक महिन्यापूर्वी अजान स्पर्धा घेतली. तेव्हाच मी म्हटलं होतं, शिवसेनेने भगवा तर सोडलाच, पण हिरवा हाती घेणं बाकी आहे. आता तर वडाळा विधानसभेच्या शिवसेनेने चक्क उर्दूमध्ये नव्या वर्षाचं कॅलेंडर काढलं. एव्हढंच नव्हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray) यांचं नामकरण करुन हिंदुहृदयसम्राट ऐवजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख जनाब बाळासाहेब असा उल्लेख केला. उर्दू आणि मुस्लिम कॅलेंडरप्रमाणे, चंद्रोदय, सूर्योदय देण्याचं काम केलं. एव्हढंच नव्हे छत्रपती शिवाजी महारांजाच्या जयंतीच्या दिवशी फक्त शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस सुद्धा या कॅलेंडरमधून करण्यात आला आहे. याचा मी निषेध करतोच. औरंगाबादचं संभाजीनगर नाही, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नामकरण जनाब बाळासाहेब ठाकरे असं मतांच्या राजकारणासाठी शिवसेनेने करुन दाखवलं”

शिवसेनेचं उर्दू कॅलेंडर

शिवसेनेच्या वडाळा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी नवीन वर्षाचं कॅलेंडर छापलं आहे. हे कॅलेंडर उर्दू भाषेतील आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब असा करण्यात आला आहे. उर्दू भाषेत बाळासाहेबांना जनाब म्हटल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. शिवाय छत्रपती शिवरायांच्या जयंतीवरुनही भाजपने निशाणा साधला.