शिवसंग्रामची राष्ट्रवादीला पाठिंब्याची घोषणा, विनायक मेटेंचा शिलेदारच भाजपात

शिवसंग्रामची राष्ट्रवादीला पाठिंब्याची घोषणा, विनायक मेटेंचा शिलेदारच भाजपात

बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा वाद निवडणुकीच्या तोंडावरही सुरुच आहे. त्यामुळे मेटेंनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही तासातच त्यांना भाजपने धक्का दिलाय. शिवसंग्रामचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून राजेंद्र मस्के भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात होतं.

पंकजा मुंडेंनी बीड जिल्हा परिषदेत संख्याबळ कमी असतानाही शिवसंग्राम आणि शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता मिळवली होती. यात शिवसंग्रामच्या राजेंद्र मस्केंच्या पत्नीला जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपद देण्यात आलं. जिल्हा परिषदेत सोबत असतानाही पंकजा मुंडे आणि मेटे यांच्यात राजकीय कुरघोडी कायम चालूच आहेत. या सर्वात राजेंद्र मस्केंची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी त्यांची युवा प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टीही करण्यात आली होती.

विनायक मेटेंनी भाजपच्या उमेदावर डॉ. प्रितम मुंडेंसाठी काम करणार नसल्याचं जाहीर केलं असलं तरी त्यांचे पदाधिकारीच भाजपात जात आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसंग्रामच्या दोन झेडपी सदस्यांनी भाजपात प्रवेश केला होता. तिसऱ्या सदस्या या राजेंद्र मस्के यांच्या पत्नी आहेत. शिवसंग्रामचे एकूण चार झेडपी सदस्य होते. त्यापैकी तीन जण आता भाजपात गेले आहेत. तर चौथा सदस्यही भाजपच्या जवळचा मानला जातो.

दरम्यान, बीडमध्ये मदत करायची असली तरच महायुतीमध्ये राहता येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावलंय. यापूर्वीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी, सोबत रहायचं असेल, तर संपूर्ण राज्यात रहावं लागेल, असं बजावलं होतं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI