“सत्ताधाऱ्यांचा डोक्यात गांडूळाचा मेंदू, संयुक्त लढ्याची आठवण”, ‘महामोर्चा’आधी संजय राऊत यांचा हल्लाबोल
'महामोर्चा'आधी संजय राऊत यांचा हल्लाबोल

मुंबई : महापुरूषांच्या अवमानाविरोधात आज महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. त्याआधी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. “महामोर्चामुळे सरकारचे पाय लटलट कापत आहेत. म्हणून मोर्चाला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. महापुरूषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडी महामोर्चा (Mahavikas Aghadi Mahamorcha) काढतेय. त्यालाही सरकार बंधनं घालतं, हे योग्य नाही. महापुरूषांविषयी यांच्या मनात किती आदर आहे हे स्पष्ट होतं”, अस म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
महामोर्चासाठी राऊतांचा खास लूक
आज महाविकास आघाडी महामोर्चा काढत आहे. या महामोर्चात संजय राऊत सहभागी होणार आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांच्या गळ्यात भगवा मफलर होता. जोडीला निळं उपरणं, डोक्यावर निळी पगडीही पाहायला मिळाली. ‘महामोर्चा’साठी संजय राऊत यांनी हा खास लूक केलाय.
ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील मोर्चे पाहिले आहेत. ती पिढी अजूनही आहे. त्यांना या मोर्चाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हाचे मोर्चे महाराष्ट्र प्रेमाने भारावलेले होते आणि आताही तसाच मोर्चा असेल. हा मोर्चा महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा आहे. लोक उत्फुर्तपणे मोर्चात सहभागी होत आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महामोर्चा
महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढत आहे. मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात होईल तर सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या इथे हा मोर्चा संपेन.
सरकारमध्ये कोणी महाराष्ट्रप्रेमी असतील तर त्यांनी मोर्चात सामील व्हावं. त्यांचं महाराष्ट्रप्रेम खोक्यात दबलं गेलं. चिरडलं गेलंय, अशी टीका करतानाच आजचा मोर्चा प्रचंड आणि अतिविराट असाच निघेल, असं म्हणत राऊतांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केलाय.
