आज महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार का? शिवसेना ठाकरे गट, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया काय?
आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्यावर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आज संध्याकाळी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये आज जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीच्या आत निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यात बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुका होऊ शकतात. या संदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर बोलल्या आहेत. “निवडणूक आयोग ही पत्रकार परिषद कशाची घेतोय? मतदार यादीत जो घोळ घातला, ते कसे दुरुस्त केले हे लोकांना सांगण्यासाठी आहे की निवडणूक घोषित करण्याची?” असा प्रश्न किशोर पेडणेकर यांनी विचारला.
“मतदार याद्यांमध्ये जो घोळ घातला, तो दुरुस्त करण्यासाठी पत्रकार परिषद असेल तर बरोबर आहे. पण डायरेक्ट निवडणूक जाहीर करायची असेल, तर ते फरफटत नेणं आहे” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ‘निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार असतील, तर याला काय म्हणावं?’ असा सवाल पेडणेकर यांनी विचारला. “निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या, तर त्याचा अर्थ दंडेलशाही चालू झालेली आहे असा होतो. घोळ काय झालाय ते सांगायचं नाही आणि तारखा जाहीर करायच्या. आम्ही विरोध केला तर निवडणुकीला विरोध करतात असं दाखवायचं. पण आमचा निवडणुकीला विरोध नाही. मतदार याद्यांमध्ये जो घोळ घातलाय पहिला तो दुरुस्त करा मग तारखा जाहीर करा ही आमची मागणी आहे. 100 पैकी 70-75 टक्के चुका दुरुस्त झाल्या की मग तारखा जाहीर करा” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
काँग्रेसची प्रतिक्रिया काय?
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. “ही निवडणूक प्रक्रिया नाही. ही लोकशाहीची हनन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मतदार यादीत घोळ असताना जबाबदारी टाळणं हे दुर्देवी आहे. दुबार मतदानाचा विषय असेल, याकडे कानडोळा करणं ही खेदजनक बाब आहे” असं सचिन सावंत म्हणाले. या बहुप्रतिक्षित निवडणूक कार्यक्रमात प्रामुख्याने 15 मोठ्या महापालिकांचा समावेश असेल, अशी माहिती समोर येत आहे.
