मनहूस घरात गेले, 15 महिन्यानंतर राजीव गांधींची हत्या, लोकांनी सांगूनही… सोनिया गांधींचा गौप्यस्फोट
सोनिया गांधींच्या आत्मचरित्रातून राजीव गांधींच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उघड झाली आहेत. मनहूस मानल्या गेलेल्या 10 जनपथ निवासस्थानी गेल्यावर 15 महिन्यांनी राजीव गांधींची हत्या झाल्याचा गौप्यस्फोट सोनिया गांधींनी केला आहे. तसेच, पंतप्रधान होण्याआधीच एका ज्योतिषाने राजीव गांधींच्या राजकीय भवितव्याची भविष्यवाणी कशी केली होती, याचे किस्सेही त्यांनी या पुस्तकात सांगितले आहेत.

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव या आत्मकथेत अनेक राजकीय घटनांचा आढावा घेतला आहे. पडद्यामागील अनेक गोष्टी त्यांनी आपल्या पुस्तकात मांडल्या आहेत. इतकंच नव्हे तर गांधी कुटुंबातील वाद आणि ताणतणावावरही त्यांनी भाष्य केलं आहे. राजीव गांधींसोबतची ओळख आणि लग्न याचे किस्सेही त्यांनी या पुस्तकात दिले आहेत. या पुस्तकात एक किस्सा सांगण्यात आला आहे. राजीव गांधी यांच्या मृत्यूशी संबंधित हा किस्सा आहे.
ऑगस्ट 1985 मध्ये राजीव गांधी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही कुटुंबासह एकत्रित जेवण करत होतो. तेव्हा अचानक अकाली नेता हरचंद सिंग लोंगोवाल यांच्या हत्येची बातमी येऊन धडकली. त्यावेळी मला ही केवळ एक दु:खद घटना नव्हे तर अशुभ संकेतही असल्याचं जाणवलं होतं, असं सोनिया गांधी यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.
अन् 15 महिन्यांनी…
10 जनपथवरील घर कसं मनहूस ठरलं याची माहितीही त्यांनी या पुस्तकात दिली आहे. 1990मध्ये आमचं कुटुंब 10 जनपथवर राहायला आलं. तेव्हा काही लोकांनी हे घर अशुभ असल्याचं सांगितलं. आम्ही दोघंही अंधश्रद्धा मानत नाही. त्यामुळे आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर तब्बल 15 महिन्यानंतर म्हणजे मे 1991 मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली, असं सोनिया गांधी यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.
तुझा नवरा पंतप्रधान होईल
1970 च्या दशकात गांधी कुटुंब दिल्लीच्या विलिंगडन क्रेसेंट येथील 12 नंबर बंगल्यात राहत होता. त्यावेळी अचानक एक ज्योतिष आमच्या घरी आला होता. त्यावेळी राजीव गांधी राजकारणात नव्हते. त्यांचा राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नव्हता. ते एक कमर्शिअल पायलट होते. तर संजय गांधी यांना इंदिरा गांधी यांचे राजकीय उत्तराधिकारी मानलं जात होतं. पांढरे शुभ्र कपडे घातलेला हा व्यक्ती हाताचे ठसे असलेला कागद घेऊन घरी आला आणि भविष्यवाणी करू लागला. त्यावेळी आम्ही ज्योतिषावर विश्वास ठेवत नसल्याचं त्याला थेट सांगितलं. तसेच त्याला तिथून निघायलाही सांगितलं. जाता जाता तो म्हणाला, संजय नव्हे, तुझे पती राजीव गांधी एक दिवस देशाचे पंतप्रधान बनणार आहेत, असं त्यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.
सोनिया गांधींच्या मते, ज्योतिष गेल्यावर त्यांनी राजीव गांधी यांच्या हातावर शाईचे निशाण पाहिले. म्हणजे तो व्यक्ती आधीच राजीव गांधींना भेटला होता आणि त्यांच्या हाताचे ठसे घेऊन गेला होता. पण त्या ज्योतिषाची भविष्यवाणीकडे राजीव गांधी यांनी करमणूक म्हणून पाहिलं. पण नंतर सोनिया गांधी विचलित झाल्या होत्या.
त्यानंतर घटनाक्रम वेगाने बदलला. जून 1980मध्ये संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर ऑक्टोबर 1984मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. अशा प्रकारे त्या ज्योतिषाने केलेली भविष्यवाणी अनेक वर्षानंतर खरी ठरली.
