मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर सहा खासदारांच्या जिवाला धोका? केंद्र सरकारचा मोठा निर्णय
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रम झाल्यानंतर गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलीस अधिक्षकांना आदेश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या संभाव्य बंडखोरीच्या चर्चेनंतर केंद्र सरकारने या सर्व खासदारांना Y+ सुरक्षा बहाल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच राज्य गुप्तचर विभागाने (SID) याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले असून, गृह विभागाकडूनही यासंबंधी सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निर्णयानुसार, प्रत्येक खासदाराच्या निवासस्थानी २४ तास पोलीस कर्मचारी तैनात राहतील आणि त्यांच्या सोबत सुरक्षा कर्मचारी राहणार आहेत.
जिल्हानिहाय सुरक्षेची हालचाल
हिंगोली : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना मतदारसंघात आल्यानंतर Y+ सुरक्षा देण्यात येणार आहे.
परभणी : खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीच्या चर्चेनंतर त्यांच्या परभणीतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस अधिकारी तान्हाजी चिखले यांनी याची माहिती दिली. गृह विभागाकडून सुरक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे.
यवतमाळ : खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रस येथील निवासस्थानाबाहेर सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. संभाव्य बंडखोरीच्या चर्चेनंतर ही खबरदारी घेण्यात आली आहे.
ईशान्य मुंबई : खासदार संजय दिना पाटील दिल्लीत असल्याची माहिती आहे. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर शांतता आहे. मात्र, कालपर्यंत कार्यकर्ते आणि पोलीस बंदोबस्त दिसत होता. आज ठाकरे गटाने दिल्लीत संसदीय बैठक बोलावली आहे, ज्यात या खासदारांची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.
शिर्डी : खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डीतील ‘साई अर्पण’ निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाकचौरे यांच्या निवासस्थानी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डी पोलिसांकडून चार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी वाकचौरे यांना फिरू न देण्याची धमकी दिल्यानंतर ही खबरदारी घेण्यात आली. शिर्डीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याने शिर्डी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
