शिवसेनेतील नाराज आमदारांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 'ॲक्शन प्लॅन'

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं शिवसेनेतील अनेक आमदार नाराज झाले. त्यामुळे शिवसेनेत मोठी खदखद निर्माण झाली.

शिवसेनेतील नाराज आमदारांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 'ॲक्शन प्लॅन'

मुंबई : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं शिवसेनेतील अनेक आमदार नाराज झाले. त्यामुळे शिवसेनेत मोठी खदखद निर्माण झाली (Uddhav Thackeray on unhappy MLA). आता या नाराजांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेतला असून याचा ॲक्शन प्लॅन तयार केलाय. त्यातील पहिल्या टप्प्यात जोगेश्वरीचे शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांना मुख्यमंत्री समन्वयक म्हणून निवडत कॅबिनेट दर्जा देण्याचा निर्णय झालाय. दुसरीकडे अर्जुन खोतकर यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तानाजी सावंत यांची नाराजी मात्र दूर करण्यात अद्याप शिवसेनेला यश आलेलं नाही.

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केली. या तिन्ही पक्षांमध्ये सत्तावाटप होताना शिवसेनेच्या वाट्यालाही काही मंत्रीपद कमी आली. शिवसेनेची मंत्रीपद कमी झाल्यामुळे मंत्रिपदाची अपेक्षा असणाऱ्यांच्या हाती निराशा आली. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं आमदार तानाजी सावंत यांच्या जाहीर वक्तव्यानं उघड झालं. आता यावर तोडगा म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडूनच पावलं उचलली जात असल्याचं दिसत आहे.

रवींद्र वायकर यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांची थेट मुख्यमंत्री समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी खास कॅबिनेट दर्जा देणारी ही विशेष पोस्ट निर्माण करण्यात आली आहे. अर्जुन खोतकर यांचीही नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं जाईल, अशी माहिती मिळत आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शिवसेनेतील नाराजीबद्दल प्रतिक्रिया देताना तानाजी सावंत यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. परब म्हणाले, “तानाजी सावंत शिवसेनेचे आमदार आहेत. केंद्राकडून कसा निधी येतो याबद्दल त्यांचा अनुभव जाणून घेऊ. त्यांचं नेमकी विधान काय आहे हेही तपासून पाहू. त्यात काही तथ्य वाटलं, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यावर ठरवतील. मातोश्रीला कोणीही आव्हान देऊ शकत नाही.” जे आव्हान देतात त्यांचं काय झालं यावर आम्ही नवीन पुस्तक आणू, असंही खोचक वक्तव्य परब यांनी केलं.

उद्धव ठाकरे तानाजी सावंत यांच्यावर नाराज असून पक्षातील इतर नेतेही त्यांच्यावर नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांनी पक्षाचं योग्यप्रकारे काम केलं नाही, असा ठपका त्यांच्यावर आहे. उद्धव ठाकरे पक्षातील नाराजांसाठी अनेक बदल करतील, असंही शिवसेनेचे नेते सांगत आहेत. या बदलांनंतर शिवसेना आमदारांची नाराजी दूर होते का? हे पहावं लागणार आहे.

Uddhav Thackeray on unhappy MLA

संबंधित व्हिडीओ:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *