राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम, पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षपदाच्या शर्यतीत

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालातील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्य सुरुच आहे. राहुल गांधी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याच्या चर्चेनंतर आता काँग्रेस नव्या अध्यक्षांची शोधाशोध करत असल्याचे वृत्त आहे. नव्या अध्यक्षपदासाठी काही नावेही चर्चेत आहेत. यात महाराष्ट्रातून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे. रिपब्लिक या वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली …

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम, पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षपदाच्या शर्यतीत

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालातील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्य सुरुच आहे. राहुल गांधी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याच्या चर्चेनंतर आता काँग्रेस नव्या अध्यक्षांची शोधाशोध करत असल्याचे वृत्त आहे. नव्या अध्यक्षपदासाठी काही नावेही चर्चेत आहेत. यात महाराष्ट्रातून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे. रिपब्लिक या वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली आहे.

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचाही समावेश आहे. काँग्रेसमधील युवा नेत्यांची यासंदर्भात नवी दिल्लीत एक बैठक होत असल्याची माहिती आहे. या बैठकीत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, दिपेंद्र हुड्डा, आर. पी. एन. सिंह, गौरव गोगोई आणि अन्य 4-5 जणांचा समावेश आहे.

काँग्रेस वर्किंग कमिटीने अर्थात कार्यकारीणीने  पक्षांतर्गत बदलासाठी राहुल गांधींना पूर्ण अधिकार दिले आहेत. तरीही काँग्रेस पक्षातही राहुल गांधींऐवजी अन्य व्यक्तीला काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी, असे मत असणारा गट आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसमधील राजीनामा सत्र

23 मे रोजी लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे मध्यप्रदेश प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री कमलनाथ, उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनाईक, आसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा, झारखंडचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजोय कुमार, पंजाबच्या गुरुदासपूर येथून सनी देओलविरोधात निवडणूक हरलेले काँग्रेस नेते सुनिल झाकर या सर्वांनी निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घेत आपले राजीनामे वरिष्ठांकडे सोपवले आहेत. राहुल गांधींनीही आपला राजीनामा दिला होता, मात्र काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने एकमताने राजीनामा नाकारल्याचीही माहिती आहे.

राहुल गांधींनी काँग्रेस नेते अहमद पटेल आणि के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेत गांधी कुटुंबाबाहेरील अन्य अध्यक्ष निवडण्यास सांगितल्याचीही चर्चा आहे. मात्र, अहमद पटेल यांनी ट्विट करत आपण वर्किंग कमिटीच्या बैठकीआधीच राहुल गांधींची वेळ घेतली असल्याचे म्हटले. तसेच ही बैठक पक्षाच्या प्रशासकीय कामांसाठी घेण्यात आली होती, असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसचे माध्यम प्रमुख रणजित सुरजेवाला यांनी सोमवारी राहुल गांधींच्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळले होते. तसेच असेच काहीही झाले नसून काँग्रेस वर्किंग कमिटी पक्षाची पुढील वाटचाल ठरवत असल्याचे स्पष्ट केले.

राहुल गांधींना लोकसभेतील काँग्रेस नेते म्हणून गळ

काँग्रेसमधील वरिष्ठ नेते राहुल गांधींना लोकसभा काँग्रेस नेतेपदासाठी गळ घालत आहे. तसेच त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये, यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. तसेच गांधी कुटुंबातील तिन्ही सदस्यांनी पक्षाच्या कोणत्या पदावर काम करणार हा निर्णय स्वतः त्यांनी घ्यावा यासाठीही प्रयत्न होत आहेत.

20 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती

20 वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये जे झाले होते, त्याचीच पुनरावृत्ती आज काँग्रेसमध्ये होताना दिसत आहे. 1998 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांना जबरदस्तीने काँग्रेस अध्यक्ष पदावरुन हटवून सोनिया गांधींना अध्यक्षपद दिल्याचे सांगितले जाते. त्यावेळी पक्षाला चावलण्याची क्षमता फक्त गांधी कुटुंबात आहे, असे मत पक्षातील नेत्यांचे होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *