Abdul Sattar : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ, निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप
राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात पूर्ण माहिती न दिल्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्यामुळे सिल्लोड प्रथमवर्ग न्यायालयाने अब्दुल सत्तार यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 60 दिवसात चौकशी अहवाल देण्याचाही सूचना कोर्टाने (Court)केल्या आहेत. त्यामुळे सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागच्या महिन्यात अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सध्या त्यांच्यावरती आरोप केले जात आहे. परंतु त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अब्दुल सत्तार यांचं टीईटी (TET) घोटाळ्यात नाव आल्यानंतर आता पुन्हा कोर्टाच्या चौकशी आदेशाने सत्तारांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी ही धोक्याची घंटा आहे.
सामाजिक कार्यकर्त्याची तक्रार
राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात पूर्ण माहिती न दिल्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत अनेक मंत्र्यांनी माहिती वैयक्तिक माहिती लपविली असल्याची प्रकरण उघडकीस आली आहेत. त्यात आता अब्दुल सत्तार यांचा समावेश होणार आहे. सिल्लोड प्रथमवर्ग न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी तक्रार दाखल केली होती अशी माहिती मिळाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात पूर्ण माहिती दिली नसल्याचा शंकरपेल्ली यांनी आरोप केला होता. विशेष म्हणजे यापुर्वी अब्दुल सत्तार यांची पोलिसांनी चौकशी केली होती. परंतु तक्रारदार समाधानी नव्हते. 60 दिवसात चौकशीचा अहवाल सादर करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.
निवडणूक नामनिर्देशन शपथपत्रांमध्ये चुकीची माहिती
अब्दुल सत्तार यांनी सन 2014 व 2019 निवडणूक नामनिर्देशन शपथपत्रांमध्ये चुकीची माहिती दिली. निवडणूक नामनिर्देशन शपथपत्रांमध्ये मौजे दहिगाव येथील शेत जमिनीचे मूल्य 2019 ला 2 लाख 76 हजार 250 व 2014 मध्ये 5 लाख 6 हजार दाखवले आहे. सिल्लोड सर्वे नंबर 90/2 वाणिज्य इमारतीची किंमत सन 2019 मध्ये 28 हजार 500 तर 2014 मध्ये 46 हजार रुपये नमूद केली आहे. सिल्लोड सर्वे नंबर 90/2 पत्नीच्या नावे असलेली वाणिज्य इमारतीची किंमत 18 लाख 55 हजार 500 रुपये तर 2014 मध्ये 1 लाख 70 हजार रुपये नमूद केली आहे.
राजकीय कारकीर्दीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
सिल्लोड सर्वे नंबर 364 निवासी इमारतीची खरेदी किंमत 2019 मध्ये 10, हजार तर 2014 मध्ये 42 लाख 66 हजार दाखवली आहे. सर्वे नंबर 364 मधील पत्नीच्या नावे असलेली निवासी इमारत सन 2019 मध्ये 1 लाख 65 हजार तर 2014 मध्ये 16 लाख 53 हजार दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर सिल्लोड न्यायालयात सीआरपीसी 200 अंतर्गत आयपीसी 199, 200, 420 व 34 तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 125 नुसार याचिका दाखल करण्यात आली आहे. सातत्याने अडचणीत येत असलेल्या अब्दुल सत्ता यांची अनेक प्रकरणे आता समोर येऊ लागलेली आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या राजकीय कारकीर्दीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
