अमित शाहांच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे म्हणाले, जय गुजरात!

अमित शाहांच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे म्हणाले, जय गुजरात!

गांधीनगर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुजरातमधील गांधीनगरमध्ये हजेरी लावली. उद्धव ठाकरेंसह भाजपचे दिग्गज नेते यावेळी मंचावर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाचा शेवट नेहमीप्रमाणे जय हिंद, जय महाराष्ट्र असा केला. मात्र आजच्या भाषणानंतर त्यांनी जय गुजरात हा नाराही त्यासोबत जोडला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी अमित शहा यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. मात्र माझ्या येण्याने काही लोकांच्या पोटात दुखत आहे. त्या पोटदुखीचा इलाज आमच्याकडे आहे. भाजप आणि आमच्यात काही मतभेद होते, परंतु आम्ही चर्चेने ते आता मिटवले आहेत. आमचा विरोध लोकांच्या कामांसाठी होता.”

आमच्यात काही मतभेद होते, पण आम्ही ते मिळून दूर केले. पाठीत खंजीर खुपसणं हे आमचे संस्कार नाही. मी इथे अमित शाहांना पाठिंबा देण्यासाठी आलोय आणि निर्मळ मनाने आलो आहे, असं उद्धव ठाकरेंनी नूद केलं.

शिवसेना आणि भाजप मनाने एक झाले आहेत. विचारधारा एकच असल्याने आम्ही पुन्हा एकत्र आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन मी अमित शाहांना शुभेच्छा देण्यासाठी आल्याचं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

अमित शहा आपल्याला भेटायला आले. आमच्यात चर्चा झाली आणि दोन्ही पक्षातील मतभेद दूर झाले. आमचे विचार, नेता आणि एकच ध्येय आहे. विरोधी पक्षांचा नेता कोण आहे, असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

शिवसेना आणि भाजपची विचारधारा एकच आहे. आमचे विचार आणि हृदय जुळले आहे. विरोधी पक्षांचे विचार जुळत नाहीत, तरी ते एकत्र आले आहेत, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी लगावला.

VIDEO: उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

Published On - 11:55 am, Sat, 30 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI