उल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक, भाजपचे सिरवानी विजयी, महाविकास आघाडीला धक्का

निनाद करमरकर

निनाद करमरकर | Edited By: अनिश बेंद्रे

Updated on: Jun 16, 2021 | 12:22 PM

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे दीपक उर्फ टोनी सिरवानी विराजमान झाले

उल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक, भाजपचे सिरवानी विजयी, महाविकास आघाडीला धक्का
दीपक (टोनी) सिरवानी

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अखेर दीपक (टोनी) सिरवानी (Tony Sirwani) यांची निवड झाली. रिपाइंच्या साथीने भाजपचे टोनी सिरवानी सभापतीपदी विराजमान झाले. महाविकास आघाडीच्या कलवंतसिंग सोहता यांचा सभापतीपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. रंगतदार निवडणुकीत शिवसेना काही नवीन खेळी खेळते का? याकडे उल्हासनगरवासियांचं लक्ष लागलं होतं. (Ulhasnagar Municipal Corporation Standing Committee Speaker Election Shivsena Vs BJP Tony Sirwani won)

कोणत्या पक्षाचे किती सदस्य?

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भाजपकडून दीपक उर्फ टोनी सिरवानी आणि शिवसेनेकडून कलवंतसिंग सोहता यांनी अर्ज दाखल केले होते. 16 सदस्यांच्या स्थायी समितीत भाजपचे 8, रिपाइं 1, शिवसेनेचे 5, राष्ट्रवादी आणि साई पक्षाचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. त्यातच भाजप आणि रिपाइं एकत्र आल्यामुळे यंदा भाजपचाच सभापती होणार हे निश्चित मानले जात होते. टोनी सिरवानी यांनी अनेक वर्ष उल्हासनगर महापालिकेत नगरसेवकपद भूषवले आहे.

फोडाफोडी टाळण्याचे भाजपचे प्रयत्न

मागील निवडणुकीत समसमान संख्याबळ असताना शिवसेनेनं भाजपच्या एका सदस्याला फोडून थेट सभापती केलं होतं. त्यामुळे यंदा फोडाफोडी होऊ नये, यासाठी भाजपनं आपले सदस्य अज्ञात स्थळी रवाना केले होते. यावेळी कुठलाही दगाफटका न होता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्याच्या साथीने भाजपला स्थायीच्या सभापतीपदी आपला उमेदवार बसवण्यात यश आले.

रिंगणात कोण कोण?

दुसरीकडे चार प्रभाग समित्यांसाठी भाजपतर्फे अनुक्रमे मीना कौर लबाना, महेश सुखरामानी, रवी जग्यासी आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर सुमन सचदेव यांनी अर्ज भरले आहेत. तर महाविकास आघाडीकडून हरेश जग्यासी आणि अंजना म्हस्के, छाया चक्रवर्ती, दीप्ती दुधानी, विकास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र खरी रंगत स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीतच होती.

संबंधित बातम्या :

उल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक, टीम कलानी शिवसेनेसोबत, भाजपच्या पाठीशी कोण?

राणेंना मंत्रिपद म्हणजे शिवसेनेच्या जखमेवर मीठ? सेना-भाजप एकत्र येण्यात कायमचा अडथळा?

(Ulhasnagar Municipal Corporation Standing Committee Speaker Election Shivsena Vs BJP Tony Sirwani won)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI