UP Elections: योगी आदित्यनाथ विरोधात भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद लढणार, गोरखपूर मतदारसंघात सामना!

UP Elections: योगी आदित्यनाथ विरोधात भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद लढणार, गोरखपूर मतदारसंघात सामना!
चंद्रशेखर आझाद यांच्या संपत्तीची माहिती

चंद्रशेखर आझाद गेल्या काही दिवसांपासून समजावादी पक्षासोबत तडजोड करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांनी मागितल्या तेवढ्या जागा देण्यास समाजवादी पार्टी नकार देत आहे. त्यामुळे आता समाजवादी पार्टीने 100 जागा दिल्या तरीही त्यांच्यासोबत युती करणार नाही, अशी भूमिका आझाद समाज पार्टीने घेतली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 20, 2022 | 1:28 PM

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Assembly elections 2022) दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहेत. या राज्यातून ताजी बातमी म्हणजे उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) हे निवडणूक लढवणार आहेत. गोरखपूर मतदारसंघातून ते योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा सामना करतील.चंद्रशेखर आझाद यांच्या पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पार्टीसोबत युतीची चर्चा अपयशी ठरल्यानंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे.

समाजवादी पार्टीसोबत आझाद पक्षाची युती नाही!

आझाद समाज पार्टीचे सुप्रीमो चंद्रशेखर आझाद म्हणाले की, ते गोरखपूर येथून योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढतील. चंद्रशेखर आझाद गेल्या काही दिवसांपासून समजावादी पक्षासोबत तडजोड करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांनी मागितल्या तेवढ्या जागा देण्यास समाजवादी पार्टी नकार देत आहे. त्यामुळे आता समाजवादी पार्टीने 100 जागा दिल्या तरीही त्यांच्यासोबत युती करणार नाही, अशी भूमिका आझाद समाज पार्टीने घेतली आहे.

कोण आहेत चंद्रशेखर आझाद?

घडकोली या छुटमलपूर जवळील गावातील मूळ रहिवासी असलेले चंद्रशेखर आझाद यांनी देहरादून येथून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. 2015 मध्ये त्यांनी भीम आर्मी भारत एकता मिशनची स्थापना केली होती. तेच या संघटनेचे संस्थापक आहेत. मे 2017 मध्ये शब्बीरपूर गावात झालेल्या जातीय दंगलींविरोधात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली होती. त्याच वेळी भीम आर्मी चर्चेत आली. तुरुंगातून सुटल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी आपले मिशन सुरुच ठेवले. दलितांविरोधातील प्रकरणात कारवाई करण्याची मागणी करत ते समाजकारणात सक्रीय राहिले. हथरस प्रकरणातील निर्घृणतेपासून राजस्थान आणि हरियाणात झालेल्या घटनांविरोधातही त्यांनी निदर्शने केली. भीम आर्मीने दलित समुदायाच्या शिक्षणासाठी भादो गावात पहिली शाळा सुरु केली होती. इतर शाळांमध्ये पुस्तकांचे वाटप करण्यात आले. साधारण वर्षभरापूर्वी चंद्रशेखर आझाद यांनी आझाद समाज पार्टीची स्थापना केली. त्यानंतर उत्तर प्रदेशातील विविध जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांदरम्यान बुलंद शहरात त्यांनी उमेदवार उभा केला होता. तीन स्तरीय पंचायत निवडणुकांनंतर ते आता विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरण्याच्या तयारीत आहेत.

गोरखपूर मतदारसंघ भाजपचा गड

गोरखपूर हा भाजपचा गड मानला जातो. मागील 33 वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सपा आणि काँग्रेसची युती झाली होती. त्यांनी राहुल राणा सिंह यांना संयुक्त उमेदवारी दिली होती. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असे वाटले होते. मात्र त्यावेळी भाजपच्या डॉ. आर. एम.डी. अग्रवाल यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गोरखपूर येथून मुख्यमंत्री आणि गोरक्षपीठाधीश्वर योगी आदित्यनाथ यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील निवडणूक अधिकच रंजक ठरली आहे. 3 मार्च रोजी या मतदारसंघासाठीचे मतदान पार पडेल. तर 4 फेब्रुवारीपासून नामांकन प्रक्रिया सुरु होईल. सपा, बसपा आणि काँग्रेसने अद्याप या जागेचे तिकिट कुणाला दिले जाईल, याबद्दल घोषणा केलेली नाही.

इतर बातम्या-

Sugarcane Crop: अतिरिक्त ऊसाचे गाळप रखडले पण क्षेत्र मोजायचे कसे? जानेवारी अखेरीस अहवालातून चित्र स्पष्ट

बॉलिवूडची ही अभिनेत्री पडली होती सामान्य मुलाच्या प्रेमात, गुपचूप लग्न केल्याची चर्चा

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें