राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, आत्या आणि भाच्याचं मनोमिलन

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, आत्या आणि भाच्याचं मनोमिलन

भोपाळ/जयपूर : रक्ताचं नातं हे राजकारणाच्या पलिकडे असतं हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं. काँग्रेसचे मध्य प्रदेशातील खासदार ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांची आत्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे हे दोघे राजकारणात शत्रू आहेत. पण ते जेव्हा समोरासमोर आले, तेव्हा आपल्या भाच्याला मिठीत घेण्यापासून आत्या स्वतःला रोखू शकल्या नाही. दोघांची भेट झाली असली तरी आत्याने भाच्याला काय कानमंत्र दिला याच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या शपथविधी सोहळ्यात हा क्षण पाहायला मिळाला.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यातही अनेक भुवया उंचावणारे क्षण पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर जहरी टीका करणारे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि कमलनाथ यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. शिवाय शिवराज सिंह काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांचा हात हातात घेऊन व्यासपीठावर उभे होते. वाचामराठ्यांची लेक वसुंधरा राजे… मोदी-शाहांनाही आव्हान देणारी मुख्यमंत्री

भोपाळमधील जम्बुरी मैदानावर झालेल्या या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. कमलनाथ यांनी व्यासपीठावरील सर्वांची भेट घेतली. पण ते राज्यात 13 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या शिवराज सिंह यांच्याजवळ आले तो क्षण पाहण्यासारखा होता.

शिवराज सिंह यांनी आपल्या बाजूलाच उभे असलेले ज्योतिरादित्य आणि कमलनाथ यांचा हात हातात घेऊन अभिवादन केलं. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील सुरु असलेल्या जहरी टीकेच्या राजकारणात या भेटीने लक्ष वेधून घेतलं.

राजस्थानमध्ये अशोक गहलोत, तर मध्य प्रदेशात कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती.

Published On - 5:14 pm, Mon, 17 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI