नगरमध्ये सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणात कोण जिंकणार?

नगरमध्ये सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणात कोण जिंकणार?

अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी अहमदनगरमध्ये मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. गुन्हेगारी कारणांमुळे चर्चेत असेलल्या नगर महापालिकेच्या 68 जागांसाठी निकाल उद्या लागणार असून हजारो उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय. या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगरची जनता महापालिकेच्या सत्तेची चावी कुणाकडे देणार याचा निर्णय उद्या होणार आहे.

भाजप नगरमध्ये पहिल्यांदाच सत्ता मिळवणार?

अहमदनगरची पालिका निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनवली होती. कारण, सुरुवातीपासूनच भाजप प्रचारात आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं. भाजपने निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी स्टार प्रचारकांची फौज उभी केली होती. तर प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पार पडला. समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, तर सांगता सभेला खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधीनी देखील मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे यात खासदार दिलीप गांधींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासोबत मुलगा सुवेंद्र आणि दीप्ती गांधी यांनाही देखील निवडून आणायचंय. तर पालिकेत आमचीच सत्ता येणार असा आत्मविश्वास खासदार दिलीप गांधीनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी-काँग्रेसची परिस्थिती काय?

आजपर्यंत महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगेसने सत्ता उपभोगली आहे. तर भाजपला अजून सत्ता मिळवता आलेली नाही. त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्ता काबीज करायची आहे. त्यासाठी भाजपने सुरुवातीपासूनच व्यूहरचना आखून प्रचारात आघाडी घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा आमदार संग्राम जगताप यांच्याकडे, तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांच्याकडे काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी होती. सुजय विखे हे लोकसभा निवणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी रंगीत तालीम असल्याचं बोललं जातंय.

दुसरीकडे केडगाव शिवसैनिकांचं हत्याकांड आणि पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणानंतर संग्राम जगताप नगरच्या राजकारणात फार काही सक्रिय दिसले नाही. मात्र महापालिका निवडणुकीची धुरा त्यांनी हाती घेतली होती. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचं त्यांच्यासमोर आव्हान होतं. मात्र भाजपने प्रशासनाचा गैरवापर केल्याचा आरोप जगताप यांनी केलाय.

माजी आमदार अनिल राठोड यांची प्रतिष्ठा पणाला

शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड हे 25 वर्ष आमदार होते. तर आत्तापर्यंत महापालिकेत सर्वात जास्त सत्ता शिवसेनेने भोगलीये. सध्या देखील पालिका सेनेच्या ताब्यात होती. तर आता भाजप आणि राष्ट्रवादीचे तगडे आव्हान सेने समोर आहे. त्यामुळे अनिल राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

छिंदमच्या भावाकडून ईव्हीएमची पूजा

मतदानाला सकाळी 7.30 ला सुरुवात झाली. तर सकाळी मतदान सुरुवात होण्याआधीच माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदमने ईव्हीएमची पूजा केली. विशेष म्हणजे ब्राह्महणाच्या हातून ही पूजा करण्यात आली. छिंदम वार्ड क्रमांक 9 मधून अपक्ष उभा आहे, तर पत्नी 13 मधूम आपलं नशीब अजमावत आहे. तसेच छिंदमवर ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी कारवाई होणार आहे, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचं त्वरित निलंबित करणार असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सकाळी काही ठिकाणी एव्हीएम बंद पडल्याची तक्रार होती. मात्र ईव्हीएम बदलून पुन्हा मतदान सुरु करण्यात आलं. तसेच निवडणूक ड्युटीवर असणारे कर्मचारी पांडुरंग सूर्यवंशी यांच्या मृत्यूची घटना सकाळी घडली. त्याचबरोबर काही किरकोळ घटना वगळता मतदान सुरळीत पार पाडलं. उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद झालंय. जनतेने कौल कुणाला दिला याचा निर्णय काही तासात होणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI