हिंगोलीत अजब प्रकार, मतदाराच्या तीन बोटांना शाई लावल्याने संशय

हिंगोलीत अजब प्रकार, मतदाराच्या तीन बोटांना शाई लावल्याने संशय

यवतमाळ/हिंगोली: देशासह महाराष्ट्रात काल 10 लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. राज्यातील दहा मतदारसंघांमध्ये हिंगोली मतदारसंघाचाही समावेश होता. मात्र हिंगोलीत अजब प्रकार समोर आला. हिंगोली लोकसभा मतदारसंघा येणाऱ्या यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दहागाव येथे, मतदान केंद्रावर एका मतदाराच्या 3 बोटांना शाई लावल्याचा प्रकार पुढे आला आहे.

राजगजेंद्र पुंडलिक जाधव यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या उमरखेड तालुक्यातील दहागाव मतदान केंद्र क्रमांक 188 इथं मतदान केलं. मतदान केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बोटाला शाई लावली. एरव्ही मतदानानंतर मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. मात्र राजगजेंद्र पुंडलिक जाधव यांच्या दोन्ही  हाताच्या तीन बोटाला शाई लावली.

बोगस मतदान होऊ नये किंवा मतदान झाल्याची ओळख म्हणून एका बोटाला शाई लावली जाते. पण जाधव यांच्या तीन बोटांना शाई का लावली असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा यात पुढे आला आहे.  निवडणूक विभागाच्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्याच्या चुकीने हे झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रासाठी 3 लाख शाईच्या बाटल्या

दरम्यान, लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात 3 लाख शाईच्या बाटल्या लागणार आहेत. त्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे.

मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य असा घटक बनली आहे.

या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरिता महाराष्ट्रातील 48 मतदार संघांमध्ये पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे 3 लाख शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली होती. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई  म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो.

मतदानापूर्वी पोलींग ऑफीसर मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI