आम्ही शिवसेनेबरोबर कधीही जाणार नाही : अजित पवार

आम्ही शिवसेनेबरोबर कधीही जाणार नाही : अजित पवार

रायगड : शिवसेना आणि आमचे विचार भिन्न आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कधीच जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर याबाबत चर्चा सुरु झाली होती. यावर बोलताना ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे उद्धव ठाकरेंना पुस्तक देण्यासाठी गेले होते.

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला आजपासून सुरुवात झाली. या माध्यमातून राज्य पिंजून काढलं जाणार आहे. भाजप सरकारने भ्रमनिरास केला असून  बेरोजगारी, महागाईसह अनेक समस्यांनी राज्याला ग्रासलंय. त्यामुळे परिवर्तन करण्याची गरज असल्याचं अजित पवार म्हणाले.

राज्यात 25 फेब्रुवारीपर्यंत निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा काढली जाणार आहे.  राज्यात किमान 75 सभा घेतल्या जातील. रोज तीन सभा घेऊन दुष्काळ, ग्रामीण शहरी समस्या, आरक्षण, हमीभाव, फसवी आश्वासने, कर्जमाफीवर आवाज उठवणार असल्याचा ईशारा अजित पवारांनी दिलाय. आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांच्या आरक्षणाचा चुनावी जुमला असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप सरकार समाजात तेढ निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली.

आघाडीवरही अजित पवारांनी भाष्य केलं. 40 जागांवर जागा वाटप झालं असून  आठ जागांवर बोलणी सुरु आहे. आघाडी संदर्भात वरिष्ठ नेते शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा झाली असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. सेक्युलर मतं एकत्र ठेवून भाजपचा पराभव करणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.

छगन भुजबळांची मोदींवर टीका

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेत मुलूख मैदानी तोफ छगन भुजबळ हे एक स्टार प्रचारक असतील. ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात संविधानाची लढाई असल्याचा आरोप भुजबळांनी केला. छत्रपती शिवरायांनी आणि राजमाता जिजाऊ यांनी रयतेचं, लोकशाहीचं राज्य केलं. मात्र भाजप सरकार काय खायचं, प्यायचं आणि लिहायचं हे ठरवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

लेखिका नयनतारा सहगल यांच्यावर राज्य कारभाराचा दबाव आणला. सरकार असंवेदनशीलता असल्याचं लिखाण केल्याने दबाव आणल्याचा आरोप भुजबळांनी केला. भाजप सरकार संवेदनावर घाला आणत असून लोकशाहीचं सरकार नसल्याचा आरोप भुजबळांनी केला.

सध्या मोदी विकासावर काहीच बोलत नाहीत. विकास भकास झाला असून नोटाबंदी ते राफेलपर्यंत सरकार फेल गेल्याची टीका भुजबळांनी केली. मराठा आरक्षण, सवर्ण आरक्षण हे निवडणूक जुमला आहे. आता ओबीसीत आरक्षणात पाच याचिका दाखल झाल्या. मात्र सरकारने विरोध करायला हवा होता. पण तो झाला नसल्याने आरक्षण राहील की जाईल, अशी चिंता भुजबळांनी व्यक्त केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI