शिवसेनेतून मंत्रिपदासाठी संभाव्य आणि इच्छुक चेहरे कोण?

कोकणात यंदा उदय सामंत यांना संधी मिळेल असं म्हटलं जात आहे. त्यासाठी दीपक केसरकर यांचा पत्ता कापला जाणार का? असा प्रश्न आहे

शिवसेनेतून मंत्रिपदासाठी संभाव्य आणि इच्छुक चेहरे कोण?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीनंतर अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त आणि उपमुख्यमंत्रिपदावर निश्चिती झाल्याची माहिती समोर आली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ठाकरे मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित आणि पहिला विस्तार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून मंत्रिपदी कोणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि कोणते आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक (Who will be Ministers from Shivsena) आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ठाण्यातून कोण?

ठाण्यात आणखी एक मंत्री पद द्यावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटतं. त्यात प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यातील राजकीय स्पर्धा जिल्ह्याच्या राजकारणात सर्वश्रुत आहे. त्यामुळे सरनाईक यांच्या नावाला शिंदे यांचा विरोध असू शकतो. बालाजी किणीकर यांच्या नावाचीही चर्चा सुरु झाली आहे. शिंदे किणीकर यांचं नाव पुढे करु शकतात.

कोकणात यंदा उदय सामंत यांना संधी मिळेल असं म्हटलं जात आहे. त्यासाठी दीपक केसरकर यांचा पत्ता कापला जाणार का? असा प्रश्न आहे. केसरकर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे केसरकरांची वर्णी ठाकरे मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता कमी मानली जाते.

कोल्हापूरचा एकमेव आमदार मंत्रिपदी?

निवडणुकीत कोल्हापूरमध्ये यंदा पक्षाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या विधानसभेत जिल्ह्यात पक्षाचे 6 आमदार असताना, त्यावेळी एकाही आमदाराची मंत्रिपदी वर्णी न लागल्यामुळे स्थानिक पातळीवर प्रचंड नाराजी होती. यंदा त्याची भरपाई केली जाण्याची शक्यता आहे. यंदा जिल्ह्यातून प्रकाश अबिटकर हे एकमेव आमदार निवडून आले आहेत. त्यांची मंत्रिपदी वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे.

Who will be Ministers from Shivsena

उत्तर महाराष्ट्रातून सुहास कांदेंना संधी?

उत्तर महाराष्ट्रात गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यंदा एक नाव अनपेक्षितपणे पुढे येण्याची चर्चा आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे सुहास कांदे हे आमदार झाले आहेत. मनसेतून शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. निवडणुकीत पक्षाला आर्थिक साहाय्य केल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. पण गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे ते वादात राहिले असल्याने, ती त्यांची कमकुवत बाजू मानली जाते.

विदर्भात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?

विदर्भात संजय राठोड यांना मंत्रिपदाची पुन्हा संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. रामटेकमध्ये अपक्ष निवडून आलेले पण शिवसेनेला पाठिंबा दिलेले तसेच मूळचे शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनाही शिवसेनेच्या कोट्यातून संधी मिळेल असं सांगितलं जातं.

शंभूराजे देसाई आणि तानाजी सावंत मंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे

पश्चिम महाराष्ट्रात शंभूराजे देसाई मंत्रिपदासाठी संभाव्य प्रमुख नाव चर्चेत आहे. ते ज्येष्ठ आमदार आहेत. तर मंत्रिपदाच्या शर्यतीतील अत्यंत महत्वाचे नाव म्हणजे तानजी सावंत. गेल्या मंत्रिमंडळात ते विधानपरिषदेत असताना शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली होती. यंदाही त्याचं कॅबिनेट मंत्रिपद कायम राहील असे सांगितले जात आहे. पक्षनेतृत्व आणि राज्याचे नेतृत्व यांची मर्जी राखण्याचे सावंत यांचे कौशल्य सर्वश्रृत आहे.

आदिती तटकरे, मकरंद पाटील, राजेश टोपे, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

मुंबईत मंत्रिपदासाठी खूप चुरस आहे. यात माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि प्रतोद सुनील प्रभू यांची नावे चर्चेत आहेत. तर विधान परिषद गटनेते अॅड अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे तेही मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.

मराठवाड्यात काँग्रेसमधून शिवसेनेत येऊन सिलोडमध्ये आमदार झालेले अब्दुल सत्तार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. ते आघाडी राजवटीत मंत्री होते. तर सलग पाच वेळा पैठण मतदारसंघातून निवडून आलेले संदीपान भुमरे यांचे नावही मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. परभणीचे राहुल पाटील यांचं नावही चर्चेत आहे.

पक्षात महिलांमध्ये शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांची मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंकडे आग्रही मागणी आहे. याच भूमिकेत चोपड्याच्या लता सोनवणेसुद्धा आहेत. विधान परिषदेतील सदस्यांना मंत्री करु नका, ही विधानसभेतील आमदारांची आग्रही मागणी राहिल्यास मनिषा कायंदे यांच्याऐवजी गावित किंवा सोनावणे यांचं नशीब उघडू शकतं.

विधान परिषदेतील सदस्यांना मंत्री पदाची संधी पुन्हा देऊ नका ही विधानसभेतील शिवसेना आमदारांची मागणी आहे. त्यामुळे पक्षात ज्येष्ठ आणि फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद भूषवलेल्या रामदास कदम आणि दिवाकर रावते यांच्याबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे लक्ष असेल. सुभाष देसाई यांनी स्वतःची मंत्रीपदी वर्णी लावून या सगळ्या रिस्थितीतून आधीच सुटका करुन घेतली (Who will be Ministers from Shivsena) आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI