अमरिशभाई पटेल यांना ‘ज्वेल्स ऑफ इंडिया’ का म्हणतात?; वाचा, सविस्तर

अमरिशभाई पटेल हे राज्याच्या राजकारणातलं मोठं नाव आहे. विकास आणि राजकारणाची सांगड घालून त्यांनी धुळ्याला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. (why people calling amrish patel as a jewel of india?, know details)

अमरिशभाई पटेल यांना 'ज्वेल्स ऑफ इंडिया' का म्हणतात?; वाचा, सविस्तर
AMRISH PATEL

मुंबई: अमरिशभाई पटेल हे राज्याच्या राजकारणातलं मोठं नाव आहे. विकास आणि राजकारणाची सांगड घालून त्यांनी धुळ्याला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच त्यांना धुळ्याचे सर्वेसर्वा, ज्वेल्स ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. शांत आणि नम्र स्वभावाच्या अमरिशभाईंच्या राजकीय कारकिर्दीवर टाकलेली ही नजर… (why people calling amrish patel as a jewel of india?, know details)

कोण आहेत अमरिश पटेल?

अमरिशभाई रसीकलाल पटेल हे धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून आले होते. काँग्रेसच्या तिकीटावर ते सलग दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले होते. परंतु विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पटेल यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची वाट धरली होती.

सलग तिसऱ्यांदा विजयी

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अमरिशभाईंनी धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला होता. पटेल यांना 332, तर अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली. त्यामुळे अमरिश पटेल यांनी 234 मतांनी बाजी मारली. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा 2009 मध्ये बिनविरोध विजय मिळवला होता. मग 2015 मधील विधानपरिषद निवडणुकीत पटेल हे 321 मतांनी विजयी झाले. त्यानंतर 2020च्या पोटनिवडणुकीत त्यांनी 234 मतांनी विजय मिळवून आपली ताकद दाखवून दिली.

अमरिशभाई 12 महिन्यांसाठी आमदार

अमरिश पटेल हे मूळचे काँग्रेसचे होते. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. अमरिश पटेल यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी राजीनामा दिल्यामुळे, विधानपरिषदेची त्यांची जागा रिक्त झाली. खरं तर अमरिश पटेल यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांचा कार्यकाळ 14 डिसेंबर 2021 पर्यंत होता. पण राजीनाम्यामुळे पुन्हा निवडणूक लागली. ही निवडणूक मार्च 2020 मध्ये नियोजित होती, पण कोरोना संकटामुळे ती पुढे ढकलली. ही निवडणूक डिसेंबर 2020 मध्ये पार पडली आणि केवळ 12 महिन्यांसाठी निवडणूक लागली. या निवडणुकीत जो उमेदवार विजयी होईल तो केवळ 12 महिन्यांसाठीच आमदार होईल हे निश्चित होतं. मात्र अमरिश पटेल यांनी पुन्हा दावेदारी दाखल करुन उरलेल्या 12 महिन्यांसाठीही आपणच आमदार असू, हे सिद्ध केलं.

राजकीय कारकीर्द

अमरिश पटेल हे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्वपूर्ण नेते होते. त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना महत्त्वपूर्ण स्थान होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला.

>> 1985 -शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष
>> 1990 -शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
>> 1995 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
>> 2000 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
>> 2005 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
>> 2009 -धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर
>> 2015 – धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर सदस्य
>> 2019 मध्ये काँग्रेस सोडली, आता 2020 मध्ये भाजपच्या तिकीटावरही विजयी

ज्वेल्स ऑफ इंडिया

अमरिशभाईंना ज्वेल्स ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. धुळ्याचे सर्वेसर्वा, धुळ्याचे अनभिषिक्त सम्राट म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांनी धुळ्यात शिक्षण क्षेत्रात प्रचंड काम केलं आहे. त्यांनी धुळ्यात शाळा, महाविद्यालयांचे जाळे निर्माण केले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी धुळ्यात केला आहे. त्यामुळेच त्यांना ज्वेल्स ऑफ इंडिया म्हटलं जातं. खास करून गुजराती समाजामध्ये त्यांची ही ओळख अधिक गडद आहे.

सामाजिक कार्य

त्यांनी शिक्षणाबरोबरच शेती क्षेत्रासाठीही मोठं काम केलं आहे. शिरपूर पॅटर्नही धुळे जिल्ह्यातीलच. शेतीला बारमाही पाणी मिळावं म्हणून त्यांनी धुळ्यात सिंचन प्रकल्प राबवले. शिरपूर पॅटर्न म्हणून या प्रकल्पाची जगभर ख्याती आहे. धुळ्यात त्यांची टेक्स्टाईल मिल्स आहे. त्यात सुमारे 6 हजार कामगार काम करतात. त्याशिवाय म्युनिसिपल जीमखाना, प्रायव्हेट क्लब्स, सुसज्ज हॉस्पिटल, अम्युसमेंट पार्क आणि त्यातील लेजर शो या सर्व गोष्टींमुळे धुळ्याची शान वाढली आहे. मुंबई-पुण्यासारख्या बड्या शहरात ज्या सोयीसुविधा आहेत, त्या सर्व धुळ्यात निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. (why people calling amrish patel as a jewel of india?, know details)

 

संबंधित बातम्या:

वडिलांबरोबर अयोध्येत कारसेवा, सव्वाशेपेक्षा अधिक आंदोलने; जाणून घ्या संघर्षशील नेत्या मनिषा कायंदेंबद्दल!

वडिलांचं निधनामुळे मायदेशी यावं लागलं आणि राजकारणात एन्ट्री झाली; वाचा जयंत पाटलांची ‘राज’नीती!

बालपणी बाळासाहेब ठाकरेंनी डोक्यावर हात ठेवला, आता पवारांचे आशीर्वाद; आमदार लंकेंची चर्चा तर होणारच!

(why people calling amrish patel as a jewel of india?, know details)